रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘एआय’ चा वापर करणार

नवी दिल्ली – कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वेने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि डेटा ॲनॅलिसिसचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हैदराबादस्थित इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसशी करार करण्यात आला असल्याचे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी सांगितले.

कार्यक्षमता

गेल्या काही महिन्यापासून रेल्वेकडून पयाभूत सुविधांच्या विकासासह आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रेल्वे स्थानके, रेल्वेयार्ड, कार्यशाळा इत्यादीसारख्या रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आता ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या वापरावर अधिक भर देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वे येत्या तीन महिन्यांत या संदर्भात केंद्र स्थापित करणार आहे.

यासाठी रेल्वे बोर्डाने प्रत्येक झोनमध्ये एक मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यावर विश्लेषण आणि ‘एआय’मधील उदयोन्मुख तंत्रज्ञानावर नजर ठेवण्याची आणि त्याचा रेल्वे प्रणालीमध्ये वापर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रेल्वेकडे प्रवाशांशी संबंधित आकडेवारी, ट्रेनच्या ऑपरेशन संबंधित आकडेवारी, मालवाहतूक आणि अगदी मालमत्तेशी संबंधित आकडेवारी असते. ‘एआय’च्या मदतीने या सर्व डेटाचे विश्लेषण केले जाईल. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (पीआरएस), नवीन गाड्यांची माहिती देणे आणि मालमत्ता व्यवस्थापनाकरीता याचा वापर करण्यात येईल असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव म्हणाले.

रेल्वेची कार्यक्षमता वाढविण्याकरिता आराखडा तयार करण्यासाठी हैदराबादमधील इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसबरोबर करार करण्यात आला आहे. ”एआय’चा वापर करण्यासाठी मागील दोन महिन्यात ८८ अधिकाऱ्यांना तयार करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने रेल्वेकडून मागील काही महिन्यांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. रेल्वे स्थानकाच्या अत्याधुनिकिकरणासह सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येत आहेत. रेल्वेचा वेग वाढवणे, रेल्वेत चांगल्या सुविधा येण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आता आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करून आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे.

leave a reply