केंद्रीय मंत्रिमंडळाची इस्रायल व ब्रिटनबरोबरील सामंजस्य करारांना मंजुरी

नवी दिल्ली – बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्यासंदर्भांत पार पडलेल्या कराराला मंजुरी देण्यात आली. तसेच ब्रिटनबरोबरील दूरसंचार आणि माहिती व प्रसारण तंत्रज्ञान सहकार्यासाठीच्या (आयसीटी) सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत इस्रायलबरॊबर झालेल्या आरोग्य आणि औषधनिर्मिती या क्षेत्रातील सामंजस्य करारास मंजुरी देण्यात आली. डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे व मनुष्यबळ विकासात मदत करणे, तसेच आरोग्य सेवा सुविधा स्थापन करण्यासाठीच्या सहकार्याचा या सामंजस्य करारात समावेश आहे. यासह औषध, वैद्यकीय उपकरणांची निर्मिती आणि विकासात भारत आणि इस्रायलमधील सहकार्य व्यापक करण्यात येणार आहे.

या बैठकीत केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) आणि युनायटेड किंगडम मेडिसिन्स आणि हेल्थकेअर प्रॉडक्टस रेग्युलेटरी एजन्सी (यूके एमएचआरए) यांच्यामधील सामंजस्य कराराला देखील मंजुरी देण्यात आली. ‘ सीडीएससीओ’ आणि ‘यूके एमएचआरए’मधील करारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जानुसार औषध निर्मिती क्षेत्राचा विकास करण्यास मदत मिळेल. तसेच उत्तम प्रयोगशाळा, क्लिनिकल सेवा, उत्पादन सेवा, वितरण सेवा आणि औषधीसंबधी दक्षता सेवेबाबत माहितीचे आदानप्रदान व सहकार्य करता येणार आहे.

याचबरोबर दूरसंचार आणि माहिती व प्रसारण तंत्रज्ञान संबंधित सामंजस्य करारामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. भारताचे दूरसंचार मंत्रालय आणि ब्रिटनमधील डिजिटल, संस्कृती, माध्यमे आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात हा करार झाला होता. या करारात स्पेक्ट्रम व्यवस्थापन, दूरसंचार व आयसीटी तंत्रज्ञान प्रमाणीकरण व चाचण्या प्रमाणित करणे यांचा समावेश आहे.

leave a reply