भारत आणि जपानमध्ये एअर बबल करारानुसार विमानसेवा सुरू होणार

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे भारत आणि जपानमध्ये ठप्प पडलेली आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी भारताने जपानबरोबर ‘एअर बबल’ करारावर स्वाक्षरी केली. भारताने आतापर्यंत १७ देशांबरोबर एअर बबल करार केले आहेत. ‘या करारानुसार जपानहून भारतात येणाऱ्या प्रवाशांना येथील भारतीय दूतावासात नोंदणी करावी लागणार नाही. ते थेट एअरलाईन्सकडून तिकिट बुक करू शकतील,’ अशी माहिती जपानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.

एअर बबल

भारत आणि जपान ‘एअर बबल’चा भाग बनले आहेत, असे जपानमधील भारतीय दूतावासाने सोशल मिडीयावरून जाहीर केले. दोन्ही देशांमध्ये एअर बबलची सेवा २ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत असणार आहे. नुकतेच एअर इंडियाने दिल्लीहून टोकियोला जाणाऱ्या उड्डाणाचे वेळापत्रक जाहीर केले. यामध्ये दिल्ली ते टोकिओ दरम्यान एअर इंडियाची विशेष विमान सेवा २ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरपर्यंत, तर टोकिओ ते दिल्ली विमान सेवा ४ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर असेल.

एअर बबल‘एअर बबल’ करार म्हणजे कोरोनाव्हायरसमुळे नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केल्यावर व्यावसायिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने दोन देशांमधील तात्पुरती व्यवस्था आहे. या करारानुसार दोन देशांमध्ये ठराविक काळासाठी विमान सेवा सुरु करण्यात येते. यामुळे या देशात जाण्यास इच्छुक असणारे प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक जण विविध देशात अडकून पडले असून कित्येकांचा व्हिसा मुदतही पूर्ण झाली आहे. अशांना ‘एअर बबल’ कराराअंतर्गत सुरु होणाऱ्या विमान सेवेचा लाभ मिळतो.

कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी २३ मार्च रोजी लॉकडाउन लागू केल्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद ठेवण्यात आली असून ही सेवा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. भारताने आत्तापर्यंत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, युक्रेन, संयुक्त अरब अमिराती, कतार, इराक, बहारीन, ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, केनिया, मालदीव, नायजेरिया या देशासोबत ‘एअर बबल’ करार आहे. या करारात, दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना काही निर्बंधांसह आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

leave a reply