पाश्चिमात्यांचा राजकीय व आर्थिक प्रभाव संपुष्टात येत आहे

-ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर

tony-blairलंडन – ‘या शतकातील सर्वात मोठा भूराजकीय बदल रशियाकडून नाही तर चीनकडून होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाश्चिमात्यांचा राजकीय व आर्थिक प्रभाव संपुष्टात येत आहे. जग किमान दोन आणि कदाचित अनेक ध्रुवांमध्ये विभागले जाणार आहे’, असा इशारा ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी दिला. येणाऱ्या काळात पाश्चिमात्य देशांनी चीनचा मुकाबला करण्यासाठी ठोस धोरण आखण्याची गरज आहे, असे ब्लेअर यांनी बजावले आहे.

शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात ब्लेअर यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख करून त्यातून मिळालेले धडे व भविष्यातील धोरणे यासंदर्भात आपली भूमिका मांडली. त्यात त्यांनी पाश्चिमात्य जगताला रशिया नाही तर चीनपासून सर्वाधिक धोका असल्याची जाणीव करून दिली. युक्रेनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलेली कारवाई पुढील काळात चीनवर तर्कशुद्ध हालचालींसाठी विश्वास ठेवता येणार नाही, याचे संकेत देणारी ठरते, असा दावा ब्लेअर यांनी केला.

Jippingचीन लगेच तैवानवर हल्ला चढवेल, असे आपल्याला म्हणायचे नाही; पण तो चढविणार नाही या समजुतीवर पाश्चिमात्य देश पुढील धोरण आखू शकणार नाहीत, याकडे ब्लेअर यांनी लक्ष वेधले. चीन हा सध्या जगातील दुसऱ्या क्रमाकांची महासत्ता असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. ‘चीनकडे असलेली शक्ती रशियाहून वेगळी असून हा देश अनेक बाबतीत अमेरिकेशी व पाश्चिमात्य देशांशी स्पर्धा करीत आहे. तंत्रज्ञानासह अनेक बाबतीत त्याने पाश्चिमात्य देशांना मागेही टाकले आहे’, असेही ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी बजावले.

चीनशी पूर्णपणे शत्रुत्त्व घेऊन चालणार नाही, मात्र त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी सर्व सहकारी देशांच्या सहाय्याने धोरण आखण्याची गरज आहे, असे ब्लेअर पुढे म्हणाले. यासाठी आफ्रिका, आखाती देश तसेच भारताची भूमिका महत्त्वाची ठरते, असेही माजी पंतप्रधान ब्लेअर यांनी यावेळी सांगितले.

leave a reply