वायुसेनेकडून ‘आकाश’ आणि ‘इग्ला’ क्षेपणास्त्रांची चाचणी

मुंबई – भारतीय वायुसेनेने आंध्र प्रदेशमधील सूर्यालंका एअरफोर्स स्टेशनवरून स्वदेशी बनावटीच्या आकाश आणि रशियाच्या इग्ला क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे. वायुसेनेच्या तळावर 23 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत युद्धसराव सुरू होता. या दरम्यान चाचण्या घेण्यात आल्याचे सांगितले जाते. या चाचणीच्या वेळी उप वायुसेना प्रमुख एअर मार्शल हरजित सिंग अरोराही उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार रहा असा संदेश यावेळी एअर मार्शल अरोरा यांनी दिला.

‘आकाश’चीनबरोबरील तणाव वाढल्यानंतर भारताच्या संरक्षणदलांकडून सतत विविध क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी केली जात आहे. मंगळवारी आंध्र प्रदेशमधील सूर्यालंका एअरफोर्स स्टेशनवर दोन क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आकाश या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्रासह ‘इग्ला’ या रशियन बानवटीच्या क्षेपणास्त्राचीही चाचणी घेण्यात आली.

आकाश आणि ‘इग्ला’ क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र असून भारतीय लष्कर आणि वायुसेनेत तैनात आहेत. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने एलएसी जवळ आकाश आणि ‘इग्ला’ची तैनाती केली आहे. भारताच्या हवाई सीमांच्या संरक्षणासाठी ही क्षेपणास्त्रे अत्यंत महत्त्वाची ठरतात. या पार्श्‍वभूमीवर या चाचण्या पार पडल्या आहेत.

एअर मार्शल अरोरा यांनी वायुसेनेच्या जवानांचे यावेळी कौतुक केले. कोरोना साथीच्या काळात पूर्ण सर्व दक्षता घेऊन चाचण्या घेण्यात आल्या व सराव पार पडला, हे खूप कौतुकास्पद आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी जवानांनी तयार रहायला हवे, असे यावेळी उप वायुसेना प्रमुख म्हणाले.

leave a reply