भारत-भूतान दरम्यान चार व्यापारी मार्ग खुले

नवी दिल्ली – भारत आणि भूतान दरम्यान चार नवे व्यापारी मार्ग खुले करण्यात आले आहेत. हे व्यापारी मार्ग पश्चिम बंगालमधील नागरकाटा, त्रिपुरातील आगरतळा आणि आसाममधील जोगीघोपा आणि पांडू येथून भूतानमध्ये जाणार आहेत. नागरकाटा येथे कायमस्वरुपी कस्टम स्टेशनही उभारण्यात आले असून कोणत्याही वस्तूंची ने-आण येथून होऊ शकते. याआधी येथे केवळ ठरावीक काळातच ठरावीक मालाची वाहतूक होत होती. यामुळे भारत आणि भूतानमधील व्यापार वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

व्यापारी मार्ग खुले

शेजारी देशांबरोबर कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भारत भर देत आहे. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी भूतानला भेट दिली होती. त्यावेळी हे व्यापारी मार्ग सुरु करण्यावर चर्चा पार पडली होती. तसेच भारत आणि भूतानमध्ये पार पडलेल्या वाणिज्यमंत्र्यांच्या व्हर्च्युअल बैठकीतही हा मुद्दा प्राथमिकतेने चर्चेत होता. यानंतर हे मार्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. यापार्श्‍वभूमीवर भारत आणि भूतानदरम्यान नागरकाटा, आगरतळा, जोगीघोपा आणि पांडू हे व्यापारी मार्ग खुले करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमधील नागरकोटा बंदरावरुन याआधी व्यापार व्हायचा. पण त्याला मर्यादा होती. तर आगरतळामध्ये व्यापारी मार्ग बांगलादेशला जोडतो. तसेच आसाममधील जोगीघोपा आणि पांडू हे आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीवरचे सामरिकदृष्टया महत्त्वाचे बंदरे आहेत. त्यामुळे या मार्गाने भारत आणि भूतानमध्ये व्यापार सुरू होणे अतिशय महत्ताचे ठरत आहे.

याआधी जुलै महिन्यात भारत आणि भूतानमध्ये पश्चिम बंगालच्या जाईगावपासून ते भूतानच्या पासाखापर्यंत व्यापारी मार्ग सुरु करण्यात आला होता. 2018 साली भारत आणि भूतानमधील द्विपक्षीय व्यापार 9227 कोटी रुपयांवर पोहोचला होता. आता नवे व्यापारी मार्ग खुले झाल्यानंतर उभय देशांमधील व्यापाराला अधिक चालना मिळेल.

दरम्यान, चीनने डोकलाममध्ये हालचाली वाढविल्या आहेत. भारत-भूतान-चीनच्या सीमा भिडणाऱ्या डोकलाममधील भागापासून काही अंतरावर भूतानच्या जमिनीवरच चीनने गाव वसविल्याच्या बातम्या आल्या होत्या. ही बाब भूतानने नाकारली असली, तरी चीनने भूतानच्या मोठ्या भूभागावर दावा सांगितला आहे. अशावेळी भारत आणिभूतानदरम्यान नवे व्यापारी मार्ग सुरू होत असून व्यूहरचनात्मक दृष्टीनेही ही बाब महत्त्वाची ठरते.

leave a reply