अमेरिका-युरोपच्या सुरक्षेसाठी घातक बनलेल्या चीनला रोखायलाच हवे

- नाटो व अमेरिकी संसदेच्या अहवालातील इशारा

सुरक्षेसाठीब्रुसेल्स/वॉशिंग्टन – चीनचे वाढते सामर्थ्य व कारवाया सध्याच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी धोका असून त्याविरोधात अमेरिकेने अधिक आक्रमक पावले उचलायला हवीत, असा इशारा अमेरिकी संसदेच्या अहवालात देण्यात आला. त्याचवेळी अमेरिका व युरोपिय देशांची लष्करी आघाडी असणाऱ्या नाटोनेही, चीनचे वर्चस्व युरोप व अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे बजावले आहे. अमेरिका व युरोपने एकाच वेळी दिलेले हे इशारे जागतिक महासत्ता होण्यासाठी धडपडणाऱ्या चीनच्या महत्त्वाकांक्षेकडे लक्ष वेधणारे ठरतात.

सुरक्षेसाठीगेल्या दशकभरात जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून समोर आलेल्या चीनने व्यापार, तंत्रज्ञान व संरक्षणक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी जोरदार धडपड सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात अमेरिकेच्या बरोबरीचे स्थान मिळवणे व त्यानंतर अमेरिकेला मागे टाकून जगातील महासत्ता बनण्याची चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी आर्थिक व लष्करी बळाच्या जोरावर आपल्याला अनुकूल धोरणे तसेच मूल्ये इतर देशांमध्ये राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या या कारवाया ठळकपणे समोर आल्या असून त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका व नाटोकडून एकापाठोपाठ प्रसिद्ध झालेले अहवाल आणि त्यात चीनच्या धोक्याला दिलेले प्राधान्य त्याचाच भाग आहे. ‘नाटो 2030: युनायटेड फॉर ए न्यू एरा’ या अहवालात सुरुवातीला रशिया व चीनच्या एकत्रि धोक्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र रशियाच्या धोका चर्चा व इतर माध्यमातून टाळणे शक्य असल्याचे सांगून चीन हा अधिक मोठा व व्यापक धोका असल्याचे बजावले. चीनच्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी नाटोने यापुढे अधिक वेळ आणि राजकीय तसेच इतर स्रोतांचा वापर करायला हवा, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनचे वाढते वर्चस्व आणि चीनच्या कारवायांचा नाटो व सदस्य देशांच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असायला हवे, याची जाणीव अहवालात करून देण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी

गेल्या वर्षी झालेल्या नाटोच्या बैठकीत सदस्य देशांच्या नेत्यांनी चीनच्या वाढत्या प्रभावाकडे लक्ष वेधले होते, याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे. त्याचवेळी चीनचे आव्हान हे रशियापेक्षा वेगळे असल्याचा दावाही करण्यात आला. रशियाचा धोका प्रामुख्याने लष्करी पातळीवर होता. मात्र चीन त्याच्या आर्थिक व लष्करी बळाच्या जोरावर ‘स्ट्रॅटेजिक अजेंडा’ राबविण्यासाठी धडपडत आहे, असे नाटोने आपल्या अहवालात म्हटले आहे. चीन केवळ लष्करी पातळीवरच नाही तर व्यापार, तंत्रज्ञान व संवेदनशील सुविधांशी निगडीत क्षेत्रातील नाटोच्या धोरणांना आव्हान ठरत असल्याचा इशारा नाटोने दिला.

नाटो चीनच्या धोक्याविरोधात सज्ज होण्याचे संकेत देत असतानाच अमेरिकेच्या संसदेनेही आपल्या वार्षिक अहवालात चिनी आव्हानाच्या वाढत्या व्याप्तीकडे लक्ष वेधले. ‘युएस-चायना इकॉनॉमिक ॲण्ड सिक्युरिटी रिव्हयू कमिशन’ने आपल्या अहवालात, चीन हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठीच धोकादायक बनल्याचा इशारा दिला आहे. आर्थिक, लष्करी, तांत्रिक तसेच राजनैतिक पातळीवरही अमेरिकेला मात देण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू असून, त्याविरोधात अधिक आग्रही व आक्रमक राहून कारवाई करायला हवी असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.

अमेरिकेची मूल्ये ही चीनच्या महत्त्वाकांक्षा व कम्युनिस्ट राजवटीच्या अस्तित्त्वासाठी धोका असल्याची चिनी राज्यकर्त्यांची धारणा आहे, याची जाणीव अमेरिकेच्या संसदीय आयोगाने करून दिली. चीनचा धोका रोखण्यासाठी आयोगाने 19 शिफारसी केल्या असून, प्रत्येक क्षेत्रात ‘जशास तसे’ची भूमिका घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कारकिर्दीतच दोन देशांमधील स्पर्धा वाढल्याचे सांगून कारवाई करण्याची हीच वेळ असल्याचे बजावण्यात आले आहे.

leave a reply