ईशान्येकडील क्षेत्रात वायुसेनेचा प्रलय युद्धसराव

नवी दिल्ली – येत्या काही दिवसात ईशान्येकडील क्षेत्रात वायुसेनेचा हवाई सराव सुरू होणार आहे. प्रलय नावाच्या या सरावात वायुसेनेची रफायल व एसयु-30 विमाने सहभागी होणार आहेत. एलएसीनजिकच्या क्षेत्रात चीनच्या हालचालींमध्ये वाढ झाल्यानंतर, इथल्या हवाई क्षेत्रावर आपले वर्चस्व गाजविण्यासाठी वायुसेनेने हा सराव करणार असल्याचे दिसते. त्यामुळे वायुसेनेचा हा सराव म्हणजे चीनसाठी सज्जड इशारा असल्याचे मानले जाते.

भारत आणि चीनमधील संबंध सुरळीत नाहीत, दोन्ही देशांमधील तणाव अजूनही कायम असल्याची जाणीव भारताचे नेते करून देत आहेत. विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यासंदर्भात केलेली विधाने चीनला झोंबणारी ठरतात. कारण चीन भारताबरोबरील आपली सीमा स्थीर असल्याचे दावे करून भारताबरोबरील आपले संबंध उत्तम असल्याचे जगाला दाखवू पाहत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनबरोबरील तणावाबाबत केलेली विधाने चीनच्या अडचणी वाढविणारी ठरतात. त्याचवेळी डोकलाम व गलवान खोऱ्यात चिनी लष्कराच्या हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या जबरदस्त प्रत्युत्तराची दखल साऱ्या जगाने घेतल्याचे देखील भारतीय नेते उघडपणे सांगत आहेत.

भारतीय नेत्यांकडून उघडपणे केल्या जाणाऱ्या या विधानांमुळे आपल्या सामर्थ्यशाली व बलाढ्य देशाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची बाब चीन गंभीरपणे घेत आहे. म्हणूनच चीनच्या लष्कराने 9 डिसेंबर रोजी एलएसीवरील तवांगच्या यांगत्से क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. याद्वारे भारतावरील आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा डाव चीनने आखला होता खरा. पण यावेळीही सावध असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा हा डाव उधळून लावला. या पार्श्वभूमीवर, एलएसीवर आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी चीन वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत आहे. यामध्ये चीनच्या हवाई दलाच्या कारवायांचा समावेश असल्याचे उघड झाले होते.

चीनचे ड्रोन्स व हेलिकॉप्टरर्स एलएसीनजिकच्या क्षेत्रात वावरून भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, लवकरच भारतीय वायुसेना प्रलय सरावाचे आयोजन करून एलएसीच्या हवाई क्षेत्रातील आपले वर्चस्व नव्याने सिद्ध करणार आहे. या युद्धसरावात भारतीय वायुसेनेची आघाडीची लढाऊ विमाने रफायल व एसयु-30 सहभागी होणार असल्याची माहिती दिली जाते. हा सराव संपल्यानंतर पुढच्या महिन्यात ‘पूर्वी आकाश’ नावाचा आणखी एक युद्धसराव वायुसेनेने आयोजित केला आहे.

त्यामुळे चीनला एलएसीवरील हवाई क्षेत्रात कुठल्याही प्रकारची संधी न देण्याची तयारी वायुसेनेने केल्याचे दिसते. एलएसीवरील क्षेत्रात भारतीय वायुसेनेची क्षमता चीनपेक्षा कितीतरी अधिक असल्याचे दावे अमेरिकन सामरिक विश्लेषकांनीही केले होते. तर भारतीय लष्कर दुर्गम तसेच पहाडी क्षेत्रातील युद्धात सर्वोत्तम असल्याची ग्वाही देखील भारत व चीनच्या संघर्षात तटस्थ असलेल्या सामरिक विश्लेषकांनी दिली होती. याचा प्रभाव एलएसीवर स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे अवस्थ झालेल्या चीनकडून भारतावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात तैनात असलेल्या चीनच्या जवानांचा उत्साह वाढविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र अजूनही लडाख तसेच एलएसजीच्या जवळील इतर क्षेत्रांमधील प्रतिकूल परिस्थितीतील तैनातीसाठी आवश्यक असलेला जोश व प्रशिक्षण चिनी लष्कराकडे नसल्याचे समोर येत आहे.

leave a reply