इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या भारतभेटीचे महत्त्व वाढले

- सहा द्विपक्षीय सहकार्य करार संपन्न होणार

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष ‘अब्देल फताह अल-सिसी’ भारताच्या भेटीवर येत आहेत. त्यांच्या या भेटीत भारताचे इजिप्तबरोबरील संबंध अधिकच भक्कम होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या उपस्थितीत भारत व इजिप्तमध्ये विविध क्षेत्रातील सहकार्याचे सुमारे महत्त्वाचे सहकार्य करार संपन्न होणार असल्याची माहिती दिली जाते. त्याचवेळी भारत व इजिप्तमधील संरक्षणविषयक सहकार्य या भेटीमुळे व्यापक होणार असल्याचे दावे विश्लेषकांकडून केले जातात.

इजिप्त भारतीय बनावटीची तेजस लढाऊ विमाने व आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्या या भारतभेटीकडे विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे. प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदाच इजिप्तचे नेते भारताच्या भेटीवर येत असून आखाती देशांमधून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आलेले अल-सिसी हे पाचवे नेते ठरतात. आखाती व आफ्रिकन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा देश असलेल्या इजिप्तबरोबर भारताचे वाढत असलेले हे सहकार्य दोन्ही देशांसाठी उपकारक ठरू शकते.

इजिप्त हा उदारमतवादी देश असून आत्तापर्यंत इजिप्तने भारताबाबत सहकार्याची भूमिका स्वीकारली होती. इस्लामधर्मिय देशांची सर्वात मोठी संघटना ‘ओआयसी-ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’मध्ये काश्मीरच्या मुद्यावर इजिप्तने अतिशय संयमी व संतुलित भूमिका मांडली होती. त्याचवेळी सध्या इजिप्तचे नेतृत्त्व करणारे अल-सिसी हे कणखर नेते असून त्यांनी दहशतवादाच्या विरोधात स्वीकारलेल्या भूमिकेची भारताने प्रशंसा केली होती. म्हणूनच दोन्ही देशांच्या सहकार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी भारत विशेष उत्सुकता दाखवित आहे.

२४ जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष अल-सिसी भारतात दाखल होतील व २५ जानेवारी रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये सुमारे सहा सहकार्य करार संपन्न होतील. यामध्ये कृषी, आयटी, सायबर सुरक्षा तसेच सुरक्षा व संरक्षणविषयक करारांचा समावेश आहे. याबरोबरच राष्ट्राध्यक्ष अल-सिसी भारतीय उद्योगक्षेत्रातील मान्यवरांची भेट घेणार असल्याची माहिती दिली जाते.

leave a reply