विमानवाहू युद्धनौका विक्रांत नौदलाच्या ताब्यात

- ऐतिहासिक घटना असल्याचा नौदलाचा दावा

विमानवाहू युद्धनौका

नवी दिल्ली – भारतीय नौदलाने कोचिन शिपयार्डकडून विमानवाहू युद्धनौका विक्रांतचा ताबा घेतला आहे. नौदलासाठी ही ऐतिहासिक घटना ठरते. कारण विक्रांत ही देशातच उभारण्यात आलेली पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. यामुळे भारत विमानवाहू युद्धनौकेची उभारणी करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या श्रेणीत सहभागी झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी विक्रांत अधिकृतरित्या नौदलात सहभागी करून घेण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जाते.

45 हजार टन इतक्या वजनाची व 262 मीटर लांब तसेच 62 मीटर रुंद आणि 59 मीटर इतक्या उंचीच्या या युद्धनौकेच्या उभारणीचे काम 2009 सालापासून सुरू झाले होते. या युद्धनौकेत 2300 कम्पार्टमेंटस्‌‍ असून यात 1700 नौसैनिक वास्तव्य करू शकतात. यामध्ये महिला नौदल अधिकाऱ्यांसाठी विशेष केबिन्सचाही समावेश आहे. तसेच ही युद्धनौका सुमारे 28 नॉटिकल मैल इतक्या वेगाने प्रवास करू शकते. 7500 नॉटिकल मैल इतका प्रवास विक्रांत करू शकते. या युद्धनौकेवर ‘मिग-29के’ लढाऊ विमाने, ‘कमाव्ह-31 हेलिकॉप्टर्स’ आणि ‘एमएच-60आर’ बहुउद्देशिय हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात येणार आहेत.

या विमानवाहू युद्धनौकेच्या उभारणीसाठी सुमारे 20 हजार कोटी रुपये इतका खर्च आला. ऑगस्ट 2021 ते जुलै 2022 पर्यंत विक्रांतच्या चाचण्या पार पडल्या. चौथ्या व अंतिम टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही युद्धनौका नौदलाकडे सोपविण्यात आली आहे. कोचिन शिपयार्डमध्ये या युद्धनौकेची उभारणी करण्यात आली असून यातील 76 टक्के भाग भारतीय बनावटीचेच आहेत. ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत योजनेचे परिपूर्ण उदाहरण ठरते, असे नौदलाने म्हटले आहे. विक्रांतला मिळालेल्या यशामुळे सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला अधिकच गती मिळेल, असा विश्वासही नौदलाने व्यक्त केलाआहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी या युद्धनौकेला नौदलात अधिकृतरित्या सहभागी करून घेतले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

विमानवाहू युद्धनौका

विक्रांतच्या सहभागामुळे भारतीय नौदलाची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. देशाच्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात गस्त घालण्याबरोबरच या क्षेत्रात आवश्यक असलेेले भारतीय नौदलाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विक्रांतचा प्रभावी ठरेल. हिंदी महासागर क्षेत्राकडे आंतरराष्ट्रीय शक्तींचे लक्ष वळले असून या क्षेत्रावरील वर्चस्व पुढच्या काळात आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल, याची जाणीव एव्हाना जगभरताली प्रमुख देशांना झालेली आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भारताचा व्यापार वाढत असताना, व्यापारी सुरक्षेबरोबरच या क्षेत्रावरील आपला नैसर्गिक प्रभाव कायम राखण्यासाठी भारताला ‘ब्ल्यू वॉटर नेव्ही’ अर्थात खोल समुद्रात सामर्थ्य गाजविण्याची क्षमता असलेल्या नौदलाची आवश्यकता आहे.

अशा परिस्थितीत सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनौकेबरोर विक्रांतसारख्या आणखी एका विमानवाहू युद्धनौकेची नितांत आवश्यका होती. यामुळेभारतीय नौदलाची धार प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान, पुढच्या काळात भारताला आणखी एका विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता भासेल, हे लक्षात घेऊन पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विशालच्या निर्मितीवर काम सुरू झाले आहे.

leave a reply