अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ

पाऊण टक्क्यांची वाढवॉशिंग्टन – बुधवारी अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात पाऊण टक्क्यांची वाढ केली. गेल्या पाच महिन्यांमधील ही चौथी दरवाढ ठरते. तर सलग दुसऱ्यांदा पाऊण टक्क्यांची वाढ करण्याची 1994 सालानंतरची ही पहिलीच वेळ आहे. या वाढीची अमेरिकेतील शेअरबाजारांमधून सकातात्मक प्रतिक्रिया उमटली. मात्र व्याजदरात वाढ होत असतानाच अमेरिकेच्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी समोर आली असून अर्थव्यवस्थेत 0.9 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत जात असल्याच्या भाकितांना दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे.

‘सध्या महागाईचा दर प्रचंड प्रमाणात वाढलेला असून मनुष्यबळ क्षेत्रातील स्थितीही कठीण बनली आहे. सप्टेंबर महिन्यातील बैठकीतही मोठ्या दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र ही बाब आता व त्यावेळी हाती असलेल्या माहितीवर अवलंबून असेल’, अशा शब्दात फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी नव्या व्याजदरवाढीचे संकेत दिले. अमेरिकेत सध्या महागाई प्रचंड प्रमाणात भडकली असून जून महिन्यात महागाई निर्देशांक 9.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.

पाऊण टक्क्यांची वाढव्याजदरात वाढ करून महागाई रोखण्याचे ध्येय फेडरल रिझर्व्हने समोर ठेवल्याचे यापूर्वी वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सलग तीन दरवाढीनंतरही महागाईत घट झालेली नसून उलट त्याची तीव्रता अधिकच वाढताना दिसत आहे. महागाईच्या भडक्यापाठोपाठ आता अमेरिकी जनतेला मंदीला तोंड द्यावे लागेल, असे संकेतही मिळत आहेत. दरवाढीच्या घोषणेनंतर 24 तासांमध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दाखविणारी आकडेवारी समोर आली. त्यानुसार, अमेरिकेच्या विकासदरात 0.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या तिमाहित अमेरिकेची अर्थव्यवस्था घसरली आहे.

तांत्रिकदृष्ट्या सलग दोन तिमाहींमधील घसरण म्हणजे अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे मानले जाते. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून ते वरिष्ठ आर्थिक अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही मंदी आल्याचे मान्य करण्यास तयार नाही. पण विश्लेषक तसेच अर्थतज्ज्ञ अमेरिका आर्थिक मंदीत असल्याकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह इतर आघाडीच्या वित्तसंस्थादेखील अमेरिका मंदावत असल्याची जाणीव करुन देत आहेत.

अमेरिकेव्यतिरिक्त जगातील अनेक आघाडीच्या देशांच्या अर्थव्यवस्था मंदावत असून त्यात युरोपिय देशांसह चीनचाही समावेश आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, वाढलेले व्याजदर, महागाईचा भडका तसेच ऊर्जा क्षेत्रातील संकट या गोष्टी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत देणाऱ्या ठरतात.

leave a reply