सिरियातील अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा कमांडर ठार झाला

ड्रोन हल्ल्यातवॉशिंग्टन – अमेरिकेच्या लष्कराने सिरियात चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा वरिष्ठ कमांडर ठार झाल्याचे जाहीर केले. यामुळे सिरियासह जगभरातील अल कायदाच्या कारवाया बाधित होतील, असा दावा अमेरिकेने केला. आखातातील अमेरिकेचे लष्करी कमांड सेंटर ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ने ही माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या या ड्रोन हल्ल्याकडे पाहिले जाते.

सिरियाच्या वायव्येकडील सुलूक शहरात शुक्रवारी अमेरिकेच्या प्रिडेटर ड्रोनने हल्ला चढविला. तुर्कीच्या सीमेजवळ असलेल्या या शहरात अल कायदाचा वरिष्ठ कमांडर अब्दुल हमिद अल-मतार दडलेला होता. या हल्ल्यात अब्दुल हमिद जागीच ठार झाला. जीवितहानीची कुठलीही माहिती नसल्याचे अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रवक्ते मेजर जॉन रिगस्बी यांनी दिली. अल कायदाचा वरिष्ठ कमांडर ठार झाल्यामुळे या दहशतवादी संघटनेच्या सिरिया आणि जगभरातील कारवायांमध्ये व्यत्यय निर्माण झाल्याचा दावा रिगस्बी यांनी केला.

ड्रोन हल्ल्यातदोन दिवसांपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाला होता. यावेळी दहशतवाद्यांनी रॉकेट्स तसेच ड्रोन्सचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. पण सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला झाल्यानंतर यावर अमेरिकेकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. शुक्रवारचा ड्रोन हल्ला दोन दिवसांपूर्वीच्या हल्ल्याचे उत्तर होते का? यावर प्रतिक्रिया देण्याचे मेजर रगस्बी यांनी टाळले.

ड्रोन हल्ल्यातकाही दिवसांपूर्वी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी सिरियात नवी लष्करी मोहीम छेडण्याची घोषणा केली होती. सिरियातील तुर्कीच्या हितसंबंधांवर सिरियन लष्कराचे हल्ले वाढत असल्याचा आरोप करून तुर्कीने कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर रशियाने तुर्कीशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, इराक, सिरिया व जगभरातील आपल्या कारवायांसाठी अल कायदा सिरियाचा वापर करीत असल्याचा अमेरिकेच्या लष्कराचे म्हणणे आहे. सुलूक या शहरावर अल कायदाचे वर्चस्व आहे. तर तुर्कीच्या सीमेजवळ असलेल्या सुलूक शहर व आजूबाजूच्या भागावर तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनांचा प्रभाव असल्याचे रशियन माध्यमांचे म्हणणे आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने सिरियाच्या इदलिब प्रांतात चढविलेल्या ड्रोन हल्ल्या अल कायदाचा कमांडर सलिब अबू-अहमद ठार झाला होता. सदर भाग देखील तुर्कीसंलग्न दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याचे रशियन माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

leave a reply