इराकची संसद बरखास्त करण्याची अल-सद्र यांची मागणी

इराकची संसदबगदाद – इराकमधील प्रभावी धार्मिक नेते मुक्तदा अल-सद्र यांनी आपल्या समर्थकांना संसदमध्ये ठिय्या कायम ठेवण्याची सूचना केली आहे. परदेशी हस्तक्षेप होत असलेली इराकची संसद बरखास्त करून निवडणुकांची घोषणा केल्याशिवाय आपले समर्थक माघार घेणार नसल्याचे अल-सद्र यांनी ठणकावले. गेले काही दिवस अल-सद्र यांनी आपल्या समर्थकांना संसद रिकामी करण्याचे आवाहन करीत होते. पण आत्ता अल-सद्र यांनी स्वीकारलेल्या नव्या आक्रमक भूमिकेमुळे इराकमधील राजकीय तणाव निवळण्याची शक्यता निकालात निघाली आहे.

गेल्या आठवड्यात अल-सद्र यांच्या समर्थकांनी हजारोंच्या संख्येने ग्रीन झ्ाोनची सुरक्षा ओलांडून इराकच्या संसदेचा ताबा घेतला होता. पुढे अल-सद्र यांनी आवाहन केल्यानंतर 24 तासानंतर सर्व निदर्शकांनी संसद रिकामी केली होती. पण दोन दिवसानंतर अल-सद्र यांच्या समर्थकांनी पुन्हा संसदेत घुसून तेथेच बस्तान मांडले. याशिवाय इराकच्या सरकारी व प्रशासकीय इमारत आणि त्यांच्या आवारातही अल-सद्र यांच्या समर्थकांनी ठाण मांडला होता. इराकमधील शियापंथियांचे प्रभावी नेते असलेले अल-सद्र आपल्या समर्थकांना नव्याने आवाहन करतील व येथील तणाव निवळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

इराकची संसदमात्र अल-सद्र यांनी आपल्या समर्थकांसमोर येऊन संसदेतील ठिय्या आंदोलन असेच सुरू ठेवण्याची सूचना केली. तर इराकची सूत्रे हाताळणाऱ्या यंत्रणांना उद्देशून अल-सद्र यांनी इशाराही दिला. इराणचे समर्थन असलेले इराकमधील राजकीय पक्ष देशासाठी योग्य ठरणार नाहीत. त्यामुळे अशा पक्षांचा समावेश असलेली इराकची संसद बरखास्त करावी आणि देशात नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी अल-सद्र यांनी केली. तसेच इराणसमर्थक राजकीय गटांबरोबर चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. कारण या चर्चेतून काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा अल-सद्र यांनी केला.

इराकचे माजी पंतप्रधान आणि इराणचा पाठिंबा असलेले नूरी अल-मलिकी यांनी अल-सद्र यांच्या विधानांवर टीका केली. अल-सद्र यांना वाटाघाटीतून प्रश्न सोडवायचे नाहीत, असा ठपका मलिकी यांनी ठेवला. मलिकी यांच्याप्रमाणे इराकच्या संसदेतील इराणसमर्थक नेत्यांनी देखील हीच भूमिका घेतली. तर इराकमधील छोट्या राजकीय पक्षांनी अल-सद्र यांच्या पुन्हा निवडणूक घेण्याच्या मागणीचे समर्थन केले. ही नवी निवडणूक देशात बदल घडवून आणील, असा विश्वास माजी पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी व्यक्त केला.

गेल्या दहा महिन्यांपासून इराकमध्ये राजकीय अस्थैर्य आहे. गेल्या वर्षी इराकमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत मुक्तदा अल-सद्र यांचा पक्ष सर्वाधिक जागांवर निवडून आला होता. पण इराकच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या इराणसंलग्न राजकीय पक्षांनी अल-सद्र यांना सरकार स्थापन करू दिले नाही. दूर ठेवले. यामुळे अल-सद्र यांच्या समर्थकांनी मोठा संताप व्यक्त केला होता.

एकेकाळी अल-सद्र देखील इराणच्या प्रभावाखाली असलेले नेते होते. पण कालांतराने अल-सद्र यांच्या इरणविषयक भूमिकेत फार मोठा बदल झ्ााला. सौदी अरेबिया व इतर अरब देशांबरोबर अल-सद्र यांची जवळीक वाढली व त्याच प्रमाणात इराण अल-सद्र यांच्या विरोधात गेल्याचे स्पष्ट झ्ााले होते. सध्या इराण आपल्या समर्थक पक्ष व गटांद्वारे इराकच्या राजकारणावर नियंत्रण ठेवून आहे. इराकमध्ये सत्तेवर असलेले सरकार इराणसमर्थक असून हाच अल-सद्र व त्यांच्या समर्थकांचा प्रमुख आक्षेप आहे. मात्र अल-सद्र यांचे समर्थक इराकला इराणच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी आंदोलन छेडत असले, तरी इराणसमर्थक राजकीय पक्ष व गट तितक्याच प्रखरतेने अल-सद्र यांना विरोध करीत असल्याचे दिसते आहे.

leave a reply