अमेरिकेत आणखी एक ९/११ घडविण्याचा ‘अल-शबाब’चा कट उघड

न्यूयॉर्क – प्रवासी विमानाचे अपहरण करून बहुमजली इमारतीवर धडक देण्याचा, ९/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट उघड झाला आहे. अल कायदाशी संलग्न असलेल्या ‘अल-शबाब’च्या दहशतवाद्याला ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी ही हादरविणारी माहिती दिली.

केनियन नागरिक असलेला ‘छोलो अब्दी अब्दुल्लाह’ तरुण फिलिपाईन्समध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेत होता. २०१६ सालापासून अब्दुल्लाह याने वैमानिकाचे प्रशिक्षण सुरू केले. याच काळात अब्दुल्लाह ‘अल-शबाब’च्या एका कमांडरच्या संपर्कात आला. गेल्या वर्षी केनियाची राजधानी नैरोबीमधील हॉटेलमध्ये घडविलेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ‘अल शबाब’चा हाच कमांडर होता. या स्फोटानंतर अब्दुल्लाहवरील संशय वाढला आणि गेल्या वर्षी फिलिपाईन्समध्ये त्याला अटक करण्यात आली. चार दिवसांपूर्वीच फिलिपाईन्सने अब्दुल्लाहला अमेरिकेकडे सोपविले होते. त्याच्या चौकशीत मिळालेली माहिती अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी मॅनहॅटन येथील न्यायालयाला दिली.

‘अल-शबाब’

अब्दुल्लाह याने वैमानिकाचा परवाना मिळविला होता. विमानाचे अपहरण, अमेरिकेतील सर्वात उंच इमारती, महत्त्वाची शहरे आणि अमेरिकेचा व्हिसा कसा मिळवायचा, यची माहिती अब्दुल्लाहने इंटरनेटवर सर्च केली होती. वैमानिकाच्या कॉकपिटमध्ये घुसून विमानाचे अपहरण करण्याचे तंत्रही अब्दुल्लाहने इंटरनेटवर शोधून पाहिल्याचे अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे अब्दुल्लाह अमेरिकेत आणखी एक ९/११ सारखा भीषण हल्ला घडविण्याच्या तयारीत असल्याचे सिद्ध होते, असा आरोप अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी केला.

‘अल-शबाब’

अब्दुल्लाहने अमेरिकी न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळले आहे. पण अब्दुल्लाहसाठी युक्तीवाद करणार्‍या वकिल जिल शेलॉ यांनी अब्दुल्लाहवर झालेल्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे अब्दुल्लाह याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा दावा सुरक्षा यंत्रणा करीत आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने देखील निष्पाप अमेरिकी नागरिकांच्या हत्येचा कट रचणे, अपहरणाची योजना आखणे असे सहा गुन्हे अब्दुल्लाहवर दाखल केले आहेत.

‘अल-शबाब’

अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने अटक केलेला अब्दुल्लाह हा ‘अल-शबाब’चा दुसरा दहशतवादी आहे. गेल्या वर्षी देखील अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेने या संघटनेचा सदस्य असलेल्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते. या दहशतवाद्याने देखील वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन अमेरिकेत हल्ला चढविण्याची योजना आखली होती, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी दिल्याची बातमी अमेरिकी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली होती.

‘अल-शबाब’ ही सोमालियातील दहशतवादी संघटना असून अमेरिकेने आधीच सदर संघटनेला ‘टेरर वॉच लिस्ट’मध्ये टाकले आहे. तर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ‘टॅ्रव्हल बॅन’च्या यादीतही सोमालियाचा समावेश आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आपण हा कठोर निर्णय घेत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले होते.

‘अल शबाब’सारखी खतरनाक दहशतवादी संघटना अमेरिकेवर हल्ला चढविण्याची तयारी करीत आहे, ही बाब केवळ अमेरिकाच नाही, तर इतर देशांनाही सावध करणारी ठरू शकते. युरोपिय देशांच्या सुरक्षा यंत्रणाही दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवून यासंदर्भात आपल्या सरकारांना सावधानतेचे इशारे देत आहेत.

leave a reply