अल्बानियाची इराणबरोबरच्या राजनैतिक सहकार्यातून माघार

तिराना – इराणने सरकारी आणि संबंधित संकेतस्थळांवर सायबर हल्ले चढविल्याचा आरोप करून अल्बानियाने इराणबरोबरच्या राजनैतिक सहकार्यातून माघार घेतली. अल्बानियाच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे इराणने म्हटले आहे. पण अमेरिकेने अल्बानियाच्या आरोपांचे समर्थन करून इराणवर अधिक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Albania Iran Embassyजुलै महिन्यात अल्बानियामध्ये सायबर हल्ला झाला होता. यासाठी अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी इराणला जबाबदार धरले. महिन्याभरापूर्वीच्या या सायबर हल्ल्यांमुळे अल्बानियाची व्यवस्था ठप्प झाली होती. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाच्या डिजिटल माहितीची चोरी झाली असून यामुळे अल्बानियाची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप पंतप्रधान एडी यांनी केला.

यानंतर अल्बानियन सरकारने इराणचे राजदूत आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना पुढील चोविस तासात देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच इराणबरोबरच्या राजनैतिक सहकार्यातून माघार घेत असल्याची घोषणा अल्बानियन सरकारने केली. अमेरिकेने देखील नाटोचा सदस्य देश असलेल्या अल्बानियाच्या आरोपांचे समर्थन केले. अमेरिकेच्या सहकारी देशाची सुरक्षा धोक्यात टाकणाऱ्या इराणला जबाबदार धरून यापुढील कारवाई केली जाईल. यासाठी नाटोमधील आर्टिकल फाईव्हचा वापर केला जाईल, असा इशारा व्हाईट हाऊसने दिला.

२०१४ साली अल्बानियाने इराणमधील राजवटविरोधी गटाच्या तीन हजार सदस्यांना आपल्या देशात आश्रय दिला होता. तेव्हापासून अल्बानिया आणि इराणमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.

leave a reply