रशिया युरोपचा इंधनपुरवठा पूर्णपणे खंडित करेल

- रशियन राष्ट्राध्यक्षांचा इशारा

युरोपचा इंधनपुरवठामॉस्को – रशियन इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न झाला तर रशिया युरोपचा इंधनपुरवठा पूर्णपणे खंडित करेल, असा खरमरीत इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. जगातील प्रगत देशांचा गट असणाऱ्या ‘जी-७’ने रशियन इंधनाचे दर नियंत्रित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानंतर युरोपिय महासंघानेही त्याचे समर्थन केले असून लवकरच यासंदर्भातील योजना जाहीर करण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे.

रशियाच्या व्लाडिवोस्तोक शहरात आयोजित ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये बोलताना पुतिन यांनी इंधनाच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याच्या योजनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.‘दर नियंत्रित करणे हा इंधन करारांचा भंग ठरतो. पाश्चिमात्य देशांनी हे पाऊल उचलले तर रशिया करार पाळणार नाही. रशियाच्या हितसंबंधांविरोधात जाईल, असे निर्णय रशिया घेणार नाही. दर नियंत्रित करणाऱ्या देशांना रशिया कोणत्याही प्रकारचे इंधन पुरविणार नाही. यात कच्चे तेल, इंधनवायू, कोळसा, हिटिंग ऑईल या सगळ्यांचा समावेश असेल’, असा इशारा रशियन राष्ट्राध्यक्षांनी दिला. एका रशियन लोककथेचा उल्लेख करीत येणाऱ्या काळात युरोप खंड गोठेल, असेही पुतिन यांनी बजावले. दरम्यान, पुतिन यांनी ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये अमेरिका व पाश्चिमात्य देशांवर केलेल्या टीकेवर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे.

युरोपचा इंधनपुरवठाअमेरिका व पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध काम करीत असून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष जगासमोर दुसरे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. अमेरिका व मित्रदेशांनी घेतलेल्या निर्णयांची रशियाला जबर किंमत मोजणे भाग पडत असल्याचा दावाही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केला.

पाश्चिमात्य देशातील उच्चभ्रू वर्ग स्वतःचे वर्चस्व कायम राखण्यासाठी विरोध करणाऱ्या देशांवर निर्बंध लादत आहे. असे निर्बंध लादून रशियाला एकटे पाडता येणार नाही, असा दावा पुतिन यांनी केला होता.

leave a reply