चीनमध्ये ‘ब्युबॉनिक प्लेग’चे रुग्ण आढळल्याने ‘अलर्ट’ जारी

Bubonic-plague-Chinaबीजिंग – चीनच्या उत्तर भागातील इनर मंगोलिया प्रांतात ‘ब्युबॉनिक प्लेग’चे चार रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सुमारे दीडशे जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाव्हायरस साथीची दुसरी लाट आल्याचे समोर आले असून काही प्रांतांमध्ये ‘स्वाईन फ्ल्यू’चा प्रसार झाल्याचेही वृत्त देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्लेगच्या नव्या साथीचे संकेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

उत्तर चीनमधील इनर मंगोलिया प्रांतात गेल्या तीन दिवसात ‘ब्युबॉनिक प्लेग’चे चार रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील दोन रुग्ण पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्या भटक्या जमातीचा भाग आहेत. चारपैकी दोन रुग्णांनी जंगली खारीचे मांस खाल्ल्याचे समोर आले आहे. त्यानंतरच्या कालावधीत जवळपास दीडशे जण चार रुग्णांच्या संपर्कात आल्याचे उघड झाले असून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ‘ब्युबॉनिक प्लेग’ची ही सर्व प्रकरणे इनर मंगोलिया प्रांतातील बयानुर शहरातील असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

Bubonic-plague-Chinaजीवाणूंमुळे होणारा ‘ब्युबॉनिक प्लेग’ हा आजार ‘ब्लॅक डेथ’ या नावानेही ओळखण्यात येतो. पिसवा चावल्यामुळे व संसर्ग झालेल्या या प्राण्यांचे मांस खाल्ल्याने या प्लेगचा प्रसार होतो. मध्ययुगीन काळात (मिडल एजेस) या ‘ब्युबॉनिक प्लेग’च्या आजाराने युरोपीय देशांमध्ये किमान पाच कोटी जणांचा बळी घेतल्याचे सांगण्यात येते. चीनमध्ये गेल्या काही वर्षात या आजाराचे मोजके रुग्ण आढळले असून आतापर्यंत पाचजणांचा बळी गेला आहे.

कोरोनाव्हायरस व स्वाइन फ्लूनंतर ‘ब्युबॉनिक प्लेग’ हा चीनमध्ये आढळलेला तिसरा मोठा आजार ठरला आहे. हा आजार प्राण्यांचे मांस व मानवी संसर्ग अशा दोन्ही माध्यमातून पसरत असल्याने ‘लेव्हल३ इमर्जन्सी’ जारी करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर, चीनमधून अनेक आजारांच्या साथी पसरू शकतात, असा इशारा पाश्चात्य वैद्यकतज्ञांनी दिला होता.

leave a reply