भारत अमेरिकेकडून ‘प्रिडेटर-बी’ ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – भारताने अमेरिकेकडे ‘प्रिडेटर-बी’ ड्रोन खरेदी करण्याची उत्सुकता दाखविली आहे. ‘सुलेमानी’ कीलर नावाने प्रसिद्ध झालेल्या या ड्रोनची मागणी भारताने अमेरिकेकडे केली असून तिन्ही संरक्षणदलांच्या ताफ्यासाठी हे ड्रोन्स खरेदी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चीन आणि पाकिस्तान सीमेवरील आव्हाने पाहत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Prediator-B-Droneचीन लडाखसीमेवर ‘विंग लॉन्ग’ या सशस्त्र ड्रोनचा वापर करीत आहे. तसेच चार ‘विंग लॉन्ग’ ड्रोन चीन पाकिस्तानला देत असल्याची बातमी आहे. याशिवाय पाकिस्तान चीनबरोबर ४८ ‘विंग लॉन्ग’ ड्रोन्सच्या संयुक्त निर्मितीसाठी करार करण्याच्या तयारीत आहे. चीनकडून पाकिस्तानला देण्यात येणारी ही ड्रोन्स सीपीईसी’ प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी भारतावर लक्ष ठेवून चीनही ड्रोन्स पाकिस्तानला पुरवित असल्याचे उघड होते. या पार्श्वभूमीवर भारताने ‘प्रिडेटर-बी’ ड्रोन खरेदीसाठी प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आले आहे.

याआधी याच ‘प्रिडेटर-बी’ ड्रोन्सची नौदल आवृत्त असलेल्या आणि केवळ टेहळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३० ‘गार्डियन’ ड्रोन्स देण्याची अमेरिकेने तयारी दाखविली होती. सुमारे चार अब्ज डॉलर्सचा व्यवहार असणारा असून नौदलाकडून या संबंधी वाटाघाटी सुरु आहेत. मात्र ‘प्रिडेटर-बी’च्या सशस्त्र आवृत्तीत भारतीय सुरक्षादलांना जास्त उत्सुकता असून लष्कराकडून या संदर्भांत विनंती करण्यात आल्यावर तिन्ही दलांसाठी ‘प्रिडेटर-बी’ खरेदी करण्याची तयारी भारताने केल्याच्या बातम्या आहेत.

जास्त उंचीवरुन उडू शकणाऱ्या, रडारला हि गुंगारा देणाऱ्या, तसेच क्षेपणास्त्र आणि लेजर गाईडेड बाँम्बने सज्ज असलेल्या या ड्रोन्सचा वापर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर दुर्गम भागात अत्यंत प्रभावीपणे होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. एकाच उड्डाणात २३० किलोमीटर वेगाने ११५० मैलाचे अंतर कापू शकणाऱ्या आणि ५० हजार फूट उंचवरुनही उडू शकणारे हे ४,७०० किलोहून अधिक वजन आपल्याबरोबर वाहून नेऊ शकते. त्यामुळे हे ड्रोन्स भारताच्या ताब्यात आल्यास भारताची सामरिक क्षमता प्रचंड वाढू शकते.

‘एमक्यू-९ रिपर ड्रोन’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या ड्रोन्सचा अमेरिकेने इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये प्रभावी वापर केला आहे. इराणच्या रीव्हॉल्युशनरी गार्ड्सचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने याच ड्रोनचा वापर करून हल्ल्यात ठार केले होते.

भारताला धोरणात्मक भागीदाराचा दर्जा देणाऱ्या अमेरिकेने दोन वर्षांपूर्वी ‘कोमकासा’ करार करून भारताला संवेदनशील तंत्रज्ञान देण्याचा मार्ग मोकळा केला होता. या अंतर्गत भारताला ही ‘प्रिडेटर-बी’ ड्रोन देण्यासंदर्भांत अमेरिका विचार करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. लडाखमध्ये चीनबरोबरील तणावानंतर भारताने ‘प्रिडेटर-बी’ खरेदी करण्याची मागणी नव्याने नोंदविल्याची बातमी येत आहे.

leave a reply