भारत आणि फिलिपाईन्समध्ये ‘पीटीए’ वर चर्चा

नवी दिल्ली – भारत आणि फिलिपाईन्सने ‘प्रिफ्रेशनल ट्रेड अॅग्रीमेंट’वर(पीटीए) चर्चा पार पडली. हा व्यापारी करार पार पडल्यास भारत आणि फिलिपाईन्समधील उत्पादनांवरील कर कमी करता येईल. यामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो. नुकतीच ‘भारत फिलिपाईन्स जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट’ची १३ वी व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत ‘पीटीए’च्या प्रस्तावावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

'पीटीए'

भारत कोरोनाच्या संकटानंतर आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध देशांबरॊबर व्यापारी सहकार्य वाढविण्यावर भर देत आहे. कोरोनाच्या संकटानंतर अनेक देश चीनचा आपल्या अर्थव्यस्थेवरील प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.भारताने या संधीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहे. अमेरिका, युरोपीय युनियन, ब्रिटनबरोबर आधीच ‘पीटीए’साठी भारत चर्चा करीत आहे. अशाच प्रकारचा करार फिलिपाईन्सबरोबरही करण्याचा प्रस्ताव भारताने ठेवला आहे.

‘पीटीए’ अंतर्गत औषधनिर्मिती, माहिती आणि तंत्रज्ञान व आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्राला प्राधान्य देता येईल. जगभरात भारताची ओळख ‘औषधांची फॅक्टरी’ अशी आहे, याकडे या बैठकीदरम्यान लक्ष वेधण्यात आले. फिलिपाईन्सही भारतासोबत ‘पीटीए’ करार करण्यास उत्सुक आहे. हा व्यावहारिक करार असून यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढेल, असे फिलिपाईन्स व्यापार विभागाचे उपसचिव ‘सेफरिनो रेडोल्फो’ म्हणाले.

फिलिपाईन्स भारताचा १४व्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार देश आहे. भारत आणि फिलिपाईन्समधील द्विपक्षीय व्यापार २०१८-१९ साली हा व्यापार २.३२ अब्ज डॉलर्सवर गेला आहे. उभय देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी भारत आणि फिलिपाईन्स नवनवीन उपक्रम सुरु करणार असल्याचे समोर आले आहे. यानुसार ‘पीटीए’ कराराचे महत्त्व वाढले आहे.

दरम्यान, २०१७ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘असियन’ आणि ‘ईस्ट आशिया समिट’ साठी फिलिपाईन्सला भेट दिली होती. त्यानंतर २०१८ साली फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी ‘इंडिया असियन समिट’ आणि प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. या भेटीगाठीनंतर भारत आणि फिलिपाईन्सचे संबंध दृढ होत गेले आहे.

leave a reply