अमेरिका गृहयुद्धाच्या वाटेवर आहे

- विख्यात गुंतवणूकदार रे डॅलिओ यांचा इशारा

गृहयुद्धाच्या वाटेवरवॉशिंग्टन – अमेरिकेतील सध्याची आर्थिक परिस्थिती आणि जनतेच्या इच्छाआकांक्षा व मूल्यांमध्ये निर्माण झालेले तीव्र मतभेद या गोष्टी देशाला गृहयुद्धाच्या वाटेवर नेणार्‍या आहेत, असा गंभीर इशारा अमेरिकेतील आघाडीची गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी दिला. ‘लिंक्ड्इन’ या सोशल मीडिया वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात डॅलिओ यांनी हा इशारा देतानाच चीन व रशियासारखे देश अमेरिकेला कडवे आव्हान देत असल्याकडेही लक्ष वेधले आहे. डॅलिओ यांनी गृहयुद्धाचा इशारा देण्याची गेल्या तीन महिन्यांमधील ही दुसरी घटना आहे.

अमेरिकेची प्रसारमाध्यमे, अभ्यासगट, विश्‍लेषक इतकेच काय तर माजी लष्करी अधिकारीही देशात तीव्र होत असलेले राजकीय धु्रवीकरण, विभाजनवादी प्रवृत्ती व गृहयुद्धाच्या वाटेवरत्यातून होणारा संघर्ष आणि हिंसाचाराच्या मुद्याकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत. माध्यमे व विश्‍लेषक २०२० सालापासून या प्रकारांची तीव्रता वाढल्याचे दावे करीत आहेत. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ या गटाने घडविलेली हिंसा, २०२० सालच्या अखेरीस झालेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, त्याचा निकाल आणि ६ जानेवारी, २०२१ रोजी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घडविलेला हिंसाचार हे मुद्दे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

गुंतवणुकदार डॅलिओ यांनीही आपल्या लेखात या मुद्यांचा उल्लेख केला आहे. मात्र त्याचबरोबर अमेरिकेतील सध्याच्या आर्थिक स्थितीकडेही लक्ष वेधले आहे. ‘वाढती आर्थिक तूट, मोठ्या प्रमाणात लादलेले कर, सातत्याने महागाईत पडणारी भर आणि त्याला आर्थिक विषमता व राजकीय पक्षपाताची मिळालेली जोड या गोष्टी अमेरिकेला गृहयुद्धाच्या दिशेने घेऊन गृहयुद्धाच्या वाटेवरजाणार्‍या ठरतील. यातून निर्माण होणार्‍या संघर्षांना हिंसक वळणही लागू शकते’, असा इशारा डॅलिओ यांनी दिला. अमेरिकेत लोकानुनायी धोरण व तीव्र टोकाची विचारसरणी यांना वाढते समर्थन मिळत असून या गोष्टी भविष्यातील युद्धसदृश संघर्षाचे संकेत देणारे घटक असल्याचेही त्यांनी बजावले.

राजकीय स्तरावर टोकाची विचारसरणी असणारे जिंकणे या एकाच गोष्टीला प्राधान्य देणार असून कायद्याला दुय्यम ठरवित असल्याची चिंता डॅलिओ यांनी व्यक्त केली. ‘आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असेल व अर्थव्यवस्था वाईट स्थितीत असेल तर अशा वेळी खर्चात कपात करून कर वाढविण्याचे धोरण स्वीकारले जाते. ही बाब गृहयुद्ध अथवा क्रांतीसदृश स्थितीला अधिकच प्रोत्साहन देणारी बाब ठरते, हे इतिहासाने दाखवून दिले आहे’, असा दावाही डॅलिओ यांनी लेखात केला आहे.

leave a reply