अमेरिकेने झिंजिआंग व तिबेटमध्ये स्पाय बलून्सच्या सहाय्याने टेहळणी केली

- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप

बीजिंग – गेल्या वर्षभरात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात ‘हाय अल्टिट्यूड बलून्स’चा वापर केला असून चीनच्या झिंजिआंग व तिबेट भागात दहा हून अधिक वेळा अमेरिकी बलून्स आढळले होते, असा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी केला. चीनने अमेरिकी बलून्सचे प्रकरण व्यावसायिकरित्या व शांतपणे हाताळले, असा दावाही चिनी प्रवक्त्यांनी केले. चीनचे हे दावे अमेरिकेने फेटाळले असून अमेरिकेने चीनच्या हद्दीत बलून्स पाठविले नसल्याचा खुलासा केला आहे.

शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने हवाईहद्दीत घुसखोरी करून टेहळणी करणारे चीनचे ‘स्पाय बलून’ पाडले होते. हा बलून पाडण्यासाठी अमेरिकेने ‘एफ-२२’ रॅप्टर लढाऊ विमान व सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर केला होता. सदर बलून हवामानविषयक संशोधनासाठी वापरण्यात येणारे बलून असून नियोजित मार्गापासून दूर गेल्याचा खुलासा चीनने केला होता. मात्र बलून्सच्या अवशेषात संवेदनशील इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स मिळाले असल्याने चीनचा दावा खोटा ठरल्याचे दिसत आहे. मात्र चीनने आपला हेका कायम ठेवला असून अमेरिकेने अवाजवी बळाचा वापर करून बलून पाडल्याची ओरड सुरू केली आहे. त्याचवेळी अमेरिकेनेही अनेकदा चीनच्या हद्दीत बलून्स पाठविल्याचे दावे केले आहेत.

काही दिवसांपूर्वी चीनच्या अधिकाऱ्यांनी तसेच सरकारी माध्यमांनी अमेरिकेने चीनच्या हद्दीत बलून्स पाठविल्याचे सांगितले होते. बुधवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेन्बिन यांनी अधिकृतरित्या अमेरिकेवर बलून्स पाठविल्याचा आरोप केला. ‘गेल्या वर्षी मे महिन्यापासून अमेरिकेचे बलून्स चीनच्या हद्दीत आढळण्याच्या घटना घडल्या होत्या. चीनच्या झिंजिआंग व तिबेट या प्रांतांमध्ये जवळपास दहा वेळा अमेरिकी बलून्स दिसले होते. चीनने याचा गाजावाजा न करता शांतपणे प्रकरण हाताळले’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी सांगितले.

अमेरिकेने चीनला कोणतीही कल्पना न देता बेकायदेशीररित्या आपले बलून्स चिनी हद्दीत पाठविले होते, असा ठपकाही प्रवक्त्यांनी यावेळी ठेवला. अमेरिकेने याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही चीनने यावेळी केली. चीन या मुद्यावर योग्य प्रत्युत्तर देईल, याची जाणीवही चिनी प्रवक्त्यांनी यावेळी करून दिली. चीनने यापूर्वी केलेले आरोप अमेरिकेने स्पष्ट शब्दात फेटाळून लावले होते. मात्र तरीही चीनकडून नव्याने आरोप करण्यात आल्याने सदर प्रकरण दोन देशांमधील तणाव अधिकच चिघळवणारे ठरेल, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, जपाननेही २०१९ ते २०२१ या कालावधीत आपल्या हवाईहद्दीत संशयास्पद चिनी बलून्सचा वावर दिसून आला होता, असा दावा केला. जपानच्या संरक्षण विभागाने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात बलून्सचा उल्लेख ‘बलून शेप्ड् फ्लाईंग ऑब्जेक्टस्‌‍’ असा करण्यात आला आहे. यासंदर्भात चीनच्या राजवटीलाही कल्पना देण्यात आल्याचे जपानच्या संरक्षण विभागाने नमूद केले. मात्र जपानचे हे दावे चीनने नाकारले आहेत.

leave a reply