‘ग्लोबल साऊथ’ला आवाज मिळत आहे

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नादी – एके काळी विकास म्हणजे पाश्चिमात्यांचे अनुकरण असा समज रूढ झाला होता. वसाहतवादाच्या काळात कित्येक भाषा व परंपरा दडपून टाकण्यात आल्या. या भाषा व परंपरांना आता जागतिक पातळीवर आवाज मिळू लागला आहे. ग्लोबल साऊथचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील आवाज घुमत असून जग बहुस्तंभिय जगाच्या दिशेने पुढे चालले आहे आणि यामुळे सांस्कृतिक समतोल साधला जात आहे, असा विश्वास भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. फिजीच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ग्लोबल साऊथचा अशारितीने केलेला उल्लेख लक्षणीय ठरत आहे.

Global Southफिजीमध्ये १२ व्या विश्व हिंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संबोधित करताना वसाहतवादाचे व पाश्चिमात्यांच्या वर्चस्वाचे विपरित परिणाम जगाला सहन करावे लागले, याची जाणीव जयशंकर यांनी करून दिली. पाश्चिमात्यांचे अनुकरण करणे म्हणजेच विकास असा समज रूढ झाला होता. पण आता हा समज मागे पडला असून ग्लोबल साऊथचा भाग असलेल्या देशांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज मिळू लागला आहे, असे सांगून भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

जागतिकीकरण म्हणजे एकजिनसीकरण नव्हे, तर जगाची बहुविधता स्वीकारणे म्हणजे जागतिकीकरण ठरते. असे जागतिकीकरण खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी व्यवस्थेचा पुरस्कार करणारे असेल, असे सांगून जयशंकर यांनी यासंदर्भातील भारताची भूमिका ठासून मांडली. अशा जागतिक व्यवस्थेमुळे बहुस्तंभिय व्यवस्था आकार घेत आहे आणि ही प्रक्रिया अधिक गतीमान झाली तर त्यामुळे सांस्कृतिक समतोल साधला जाईल, असा विश्वास भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला.

अशा परिस्थितीत इतर संस्कृती व सभ्यतांची माहिती देणे आवश्यक ठरते आणि यासाठी विविध भाषांचा प्रसार करणे महत्त्वाचे ठरेल, असा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

leave a reply