आखातातील अस्थैर्यासाठी इस्रायल जबाबदार आहे

- लेबेनॉनच्या परराष्ट्रमंत्र्याचा आरोप

Abdallah Bou Habibकैरो – आखाती देशांमध्ये वाढत असलेली असुरक्षा, अस्थैर्यामागे इस्रायल हेच मूळ कारण असल्याचा आरोप लेबेनॉनचे परराष्ट्रमंत्री अब्दल्ला बोउ हबिब यांनी केला. इस्रायलची लढाऊ विमाने लेबेनॉनमध्ये घुसखोरी करून सिरियात हवाई हल्ले चढवित असल्याचा दाखला लेबेनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. इजिप्तमध्ये आयोजित अरब लीगच्या बैठकीमध्ये लेबेनॉनने हा ठपका ठेवला.

लेबेनॉनमधील हंगामी सरकारचे परराष्ट्रमंत्री हबिब यांनी इस्रायलच्या सिरियातील कारवायांवर टीका केली. इस्रायलच्या या कारवायांना या क्षेत्रातून किंवा आंतरराष्ट्रीय स्तरातून उत्तर दिले जात नाही, म्हणून इस्रायल बेधडकपणे लेबेनॉनच्या हवाईहद्दीच उल्लंघन करून सिरियात हल्ले चढवित असल्याचा आरोप हबिब यांनी केला. त्याचबरोबर पॅलेस्टाईनचा मुद्दाही हबिब यांनी या बैठकीत उपस्थित केला. अरब शांती करारात ठरल्याप्रमाणे इस्रायलने पॅलेस्टाईनचा भूभाग परत करावा, ही आपल्या सरकारची मागणी असल्याचे लेबेनॉनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

leave a reply