अण्वस्त्रवाहू ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या संरक्षणदलात समावेशाला मंजुरी

नवी दिल्ली – अण्वस्त्रवाहू ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर या क्षेपणास्त्राला लष्कराच्या ताफ्यात सामील करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच क्षेपणास्त्राच्या तैनातीलाही मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे. हे क्षेपणास्त्र लवकरच ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’च्या देखरेखीखाली ‘इंडियन स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’ने निवडलेल्या ठिकाणांवर तैनात करण्यात येईल. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘शौर्य’च्या संरक्षणदलात समावेशाला आणि तैनातीला मिळालेली मंजुरी चीन आघाडीचा विचार करून घेतलेला निर्णय असल्याचे दावे केले जात आहेत.

'शौर्य'

‘शौर्य’ क्षेपणास्त्र पाणबुडीवरून सोडल्या येणाऱ्या ‘बीए -०५’ क्षेपणास्त्राची जमिनीवरून सोडण्यात येणारी आवृत्ती आहे. गेल्या आठवड्यात ३ ऑक्टोबरला या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्तीची चाचणी घेण्यात आली होती. हजार किलोची स्फोटके वाहण्यास सक्षम असलेले ‘शौर्य’ ८०० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. शौर्यची नवी आवृत्ती हलकी आणि वापरण्यास सुलभ आहे.

लक्ष्याच्या दिशेने जाताना अंतिम टप्प्यात हे क्षेपणास्त्र हायपरसॉनिक गती घेते. शत्रूच्या रडाराला या क्षेपणास्त्राला ओळखून इंटरसेप्ट करण्यास केवळ ४०० सेकंदाचा वेळा मिळतो. तसेच हे क्षेपणास्त्र कुठल्याही वातावरणात तैनात करता येऊ शकते. या क्षेपणास्त्राचे वजन सुमारे १६० किलो आहे.

गेल्या महिनाभरात भारताने चार क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. हायपरसॉनिक शौर्य क्षेपणास्त्र आणि स्मार्ट क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी घेऊन भारताने चीनल स्पष्ट इशारा दिला होता. पुढील काही दिवसांत सबसॉनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली जाईल आणि हे क्षेपणास्त्र भारतीय सैन्य व नौदलात समाविष्ट केले जाणार आहे, असे वृत्त आहे.

leave a reply