छत्तीसगडमध्ये पाच माओवाद्यांची सहकाऱ्यांकडूनच हत्या

रायपूर – छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पाच माओवाद्यांची त्यांच्याच सहकाऱ्यांनी हत्या केली. आठवडाभरात ही अशाप्रकारची दुसरी घटना आहे. निर्दोष ग्रामस्थांच्या हत्येवरून माओवाद्यांमध्ये मतभेद निर्माण झाले असून प्रभाव कमी होत असल्यानेही माओवादी अस्वस्थ बनल्याचे दावे केले जातात. आपल्याच सहकाऱ्यांबरोबर झालेल्या वादानंतर झालेल्या संघर्षात ठार झालेल्या या माओवाद्यांवर तीन ते पाच लाखांचे इनाम होते.

पाच माओवाद्यांची

संदीप उर्फ बुधराम, लखू हेमला, संतोष, दासरू मांडवी, कमलु पुनीम अशी ठार झालेल्या आलेल्या माओवाद्यांची नावे आहेत. ठार मारण्यात आलेल्या माओवाद्यांपैकी चार माओवादी गंगलूर क्षेत्र समितीत सक्रिय होते. तर संतोष पामेड क्षेत्र समितीत कार्यरत होता. या हत्येबाबत अधिक माहिती गोळा केली जात असल्याचे बस्तर भागातील पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले.

मात्र प्राथमिक माहितीनुसार या भागातील माओवाद्यांनी काही निर्दोष गावकऱ्यांची हत्या केली होती. पोलिसांचे खबरी असल्याचे सांगत या हत्या करण्यात आला होत्या. मात्र गावकऱ्यांच्या हत्येनंतर त्यांच्यात आपापसात वाद निर्माण झाला. माओवाद्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाचा हा निकाल असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले.

पाच माओवाद्यांची

याआधी गेल्या आठवड्यात माओवाद्यांनी त्यांच्याच विभागीय समिती सदस्य मोदीम विज्जा यांची हत्या केली होती. गंगालूर क्षेत्र समितीचा सचिव दिनेश मोदीम आणि गंगालूर क्षेत्र समिती विभागीय समिती सदस्य मोदीम विज्जा यांच्यात इटवार गावच्या जंगलात चार ते पाच दिवसांपूर्वी वाद झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून बस्तर पोलिसांना माहिती मिळाली आहे. यावेळी दिनेश आणि विज्जा यांनी एकमेकांवर हल्ला केला होता. या घटनेत मोदीम विज्जा ठार झाला.

आपल्याच साथीदारांकडून ठार झालेले पाच माओवादीही विज्जाच्या नेतृत्वाखाली काम काम करत होते. निर्दोष ग्रामस्थांच्या हत्येवरून झालेल्या मतभेदांमुळे विजापूर जिल्ह्यात सहा माओवाद्यांचा त्यांच्याच साथीदाराने बळी घेतला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

यावर्षी छत्तीसगडच्या बस्तर भागात माओवाद्यांनी ४३ गावकऱ्यांच्या हत्या केल्या आहेत. ४३ पैकी ११ गावकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मारण्यात आले. निर्दोष ग्रामीण नागरिकांच्या माओवाद्यांकडून केल्या जात आहेत. हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष आहे. सुरक्षादलांची जोरदार कारवाई आणि त्याचवेळी सुरु असलेल्या विकासकामांमुळे गेल्या काही काळात माओवाद्यांचा प्रभाव घटत आहे. यामुळे अस्वस्थ झालेले माओवादी दहशत निर्माण करण्यासाठी या हत्या घडवित असल्याचे समोर आले आहे. यातून माओवाद्यांमध्येही मतभेद वाढत आहेत. या सर्व परिस्थितीवर लक्ष देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

leave a reply