‘पीएलआय’अंतर्गत सॅमसंग, फॉक्सकॉनसह १६ कंपन्यांच्या प्रस्तावाला मंजुरी 

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मंगळवारी ‘प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (पीएलआय) या योजनेअंतर्गत मोबाईल हॅण्डसेट उत्पादन करणाऱ्या १६ परदेशी आणि देशी कंपन्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.  ‘पीएलआय’ योजनेनुसार पुढील पाच वर्षात भारतात ११.५ लाख कोटी रुपयांचे स्मार्टफोन तयार करण्याचे लक्ष्य आहे. या गुंतवणुकीमुळे देशातल्या १२ लाख जणांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

'पीएलआय'

एप्रिल महिन्यांत केंद्र सरकारने ४१ हजार कोटींच्या ‘पीएलआय’ योजनेची घोषणा केली होती. यानुसार ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत परकीय आणि देशी कंपन्यांना भारतात स्मार्टफोन निर्मितीसाठी कारखाने उभारल्यास काही सवलती देण्यात येणार  आहेत. या योजनेचा लाभ उचलून भारतात आपले कारखाने स्थापण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी २२ कंपन्यांनी अर्ज केल्याच्या बातम्या गेल्या महिन्यात आल्या होत्या. यातील १६ कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना पीएलआय योजनेअंतर्गत भारतात उत्पादनास मंजुरी देण्यात आली आहे.

यामध्ये अ‍ॅपलचे फोन बनविणाऱ्या फॉक्सकॉन, हनौई, पेगाट्रॉन आणि विस्ट्रोन या कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय सॅमसंग, मायक्रोमॅक्स, लावा, युटीएस नियो लिंक्स, ऑप्टिमस यासारख्या कंपन्यांच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.  स्मार्टफोन्सच्या बाबतीत अॅपल आणि सॅमसंगचा एकत्रित जागतिक विक्री महसूल हा जवळपास ६० टक्क्यांवर आहे. त्यामुळे या दोन मोठ्या कंपन्यांची भारतातली गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची ठरते.

'पीएलआय'

‘पीएलआय’ योजनेअंतर्गत स्थानिक उत्पादन वाढविणे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये भारताला ‘ग्लोबल हब’ बनविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. ‘पीएलए’ला मिळणारा प्रतिसाद पाहता ही योजना यशस्वी होईल. यामुळे भारताची इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम मजबूत होईल,असा विश्वास रविशंकर प्रसादयांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या संकटानंतर चीनविरोधात प्रचंड रोष असून कित्येक कंपन्या चीनमधून आपले कारखाने हलवीत आहेत. या संधीचा लाभ उचलण्यासाठी भारताने गुंवणूक नियम सुलभ कारण्याबरोबर काही सवलतीही देऊ केल्या आहेत.  स्मार्टफोन निर्मितीमध्येही आत्मनिर्भर होण्याचा निर्धार केला. २०१४ साली भारतात दोन इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट होते. आता ही संख्या २६० वर गेल्याचे रविशंकर प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

स्मार्टफोन उत्पादनामध्ये भारत पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता चीनला मागे टाकून भारताला या आघाडीवर पहिल्या क्रमांकावर यायचे आहे. त्यासाठीच भारताची धडपड सुरु आहे. या प्रयत्नांमुळे येत्या काळात स्मार्टफोन  क्षेत्रात आघाडीवर असलेला चीनचे भारतीय बाजारपेठेतील वर्चस्व संपुष्टात येईल, तसेच जागतिक बाजारपेठेतही भारत अधिक स्मार्टफोन निर्यात करून चीनला मोठा दणका देईल, असे दावे केले जातात.

leave a reply