पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून क्षेपणास्त्रांची तैनाती

- चिनी सैनिकांना पाकिस्तानकडून डोंगराळ युद्धाचे प्रशिक्षण

नवी दिल्ली – लडाखच्या गलवान व्हॅली आणि पँगाँग त्सोच्या आघाडीवर भारतीय सैनिकांसमोर नामुष्की पत्करावी लागल्यानंतर हताश झालेल्या चीनने पाकिस्तानचा वापर करुन भारताविरोधात आघाडी उघडण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) जवानांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील किमान दोन ते तीन ठिकाणी क्षेपणास्त्रे तैनात करण्यास सुरुवात केली आहे. तर येथील काही भागात पाकिस्तानी आणि ‘पीएलए’चे जवान संयुक्त गस्त घालत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली. तर पर्वतीय क्षेत्रातील युद्धात तरबेज असणार्‍या भारतीय सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी ‘पीएलए’ने भाडोत्री सैनिक म्हणून पाकिस्तानच्या जवानांनाच पुढे केल्याचे चिनी पत्रकारांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओतून उघड झाले आहे.

क्षेपणास्त्रांची तैनाती

‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर’च्या (सीपीईसी) अंतर्गत चीनने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान भागात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी सुरू केली असून यामध्ये पाकिस्तानी जवान तसेच कंत्राटी कामगारांबरोबर चिनी जवानही तैनात असल्याचे याआधीच समोर आले होते. आता हेच चिनी जवान पाकिस्तानच्या लष्कराबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जमिनीवरुन हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांची तैनाती करीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या लसादाना धोक येथील ‘पाउली पिर’ तसेच हातियान बाला जिल्ह्यातील ‘चिनार’ आणि ‘चाकोती’ गावात चीनने क्षेपणास्त्रांच्या तैनातीसाठी बांधकाम सुरू केले आहे.

या बांधकामात १२० पाकिस्तानी जवान गुंतलेले असून पाउली पिर येथील कंट्रोल रुमचा ताबा ‘पीएलए’च्या दहा जवानांकडे असणार आहे. यामध्ये तीन वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून समोर आले आहे. चिनार आणि चाकोती येथील तैनातीसाठी देखील अशीच व्यवस्था करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पाकव्याप्त काश्मीरच्या देओलिया आणि जूरा या भागात पाकिस्तानी आणि पीएलए’चे जवान संयुक्त गस्त घालत असल्याचेही गुप्तचर यंत्रणेच्या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ‘१२ इंफंट्री ब्रिगेड’चे जवान या गस्तीत सहभागी असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. काही आठवड्यांपूर्वी चीनचे लष्करी मालवाहू विमान गिलगिट बाल्टिस्तानच्या स्कार्डू हवाईतळावर उतरले होते.

क्षेपणास्त्रांची तैनाती

पाकव्याप्त काश्मीरमधील या सैन्यतैनातीबरोबर चीनने लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील युद्धासाठी देखील पाकिस्तानच्या जवानांचा वापर सुरू केल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या सरकारी मुखपत्राच्या एका पत्रकाराने ‘पीएलए’चा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये ‘पीएलए’चे जवान गलवानच्या खोर्‍यात तैनात असल्याचा दावा करुन सदर जवान चिनी राष्ट्रगीत गात असल्याचे दाखविण्यात आले होते. ५२ सेकंदाच्या या व्हिडिओतील पहिल्या पाचव्या सेकंदालाच चिनी लष्कराच्या गणवेषात पाकिस्तानचा जवान तैनात असल्याचे उघड झाले होते. चिनी जवानांपेक्षा वेगळी अंगकाठी असणारा हा पाकिस्तानचा जवान असल्याचे सोशल मीडियावर अनेकांनी निदर्शनास आणून दिले होते.

एकाच दिवसापूर्वी भारताच्या वायुसेनाप्रमुखांनी चीन व पाकिस्तानच्या आघाडीवर एकाचवेळी युद्धासाठी वायुसेना सज्ज असल्याचा इशारा दिला होता. त्यामागे चीन व पाकिस्तानमध्ये झालेली ही हातमिळवणी असल्याचे उघड होत आहे. पाकिस्तानी विश्लेषकही भारत आणि चीनचे युद्ध पेटल्यास पाकिस्तान चीनच्या बाजूने या युद्धात उतरेल, असे जाहीर करुन टाकले होते. त्या पार्श्वभूमीवर, भारताने चीन व पाकिस्तानचा एकाचवेळी मुकाबला करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचा संदेश दिला आहे.

leave a reply