अमेरिका आणि चीन व्यापारयुद्धाचा भारतीय वस्त्रोद्योगाला लाभ होईल

- 'इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च'चा अहवाल

नवी दिल्ली – अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध म्हणजे भारताच्या वस्त्रोद्योग कंपन्यांसमोर चालून आलेली एक संधी असल्याचे ‘इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेने चीनच्या झिंजियांग प्रांतात उघुर कामगारांचा छळ होत असल्याचा आरोप करुन इथल्या कापूस आणि वस्त्रांची आयात रोखून धरली आहे. याचा फायदा भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला होऊ शकतो, असा विश्वास या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

वस्त्रोद्योग

२०२० सालच्या जानेवारी ते जुलै दरम्यान अमेरिकेने चीनकडून ७.३५ अब्ज डॉलर्स इतकी वस्त्र उत्पादने आयात केली होती. तसेच या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चीनने अमेरिकेला २० टक्के वस्त्र उत्पादने निर्यात केल्याचे या अहवालातून म्हटले. त्याचवेळी चीन कच्च्या कापसासाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. पण अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या तणावामुळे चीन ब्राझिल आणि भारताला पसंती देत आहे. त्यामध्ये भारत आणि चीनमध्ये भडकलेल्या संघर्षामुळे भारताच्या सुती वस्त्र कंपन्यांनीही चीनवरची निर्भरता २० टक्क्यांनी कमी केली आहे. मात्र व्हिएतनाम आणि पाकिस्तानसोबत भारताची स्पर्धा असल्याचे या अहवालातून म्हटले.

अमेरिका चीन व्यापारयुध्द आणि कोरोनाव्हायरसच्या संकटाचा फायदा घेऊन भारताने वस्त्रोद्योग क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला अहवालात देण्यात आला आहे. पण त्याआधीच भारताच्या वस्त्रोद्योगाने या संधीचा लाभ उचलण्यासाठी हालचाली सुरु केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, आत्मनिर्भर भारतासाठी वस्त्रोद्योग क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच म्हटले होते.

leave a reply