सिरियाला संघटनेत सामील करुन अरब लीगने गंभीर धोरणात्मक चूक केली

- अमेरिकेचा अरब लीगला इशारा

वॉशिंग्टन/न्यूयॉर्क – ‘अरब लीगने सिरियातील अस्साद राजवटीला संघटनेत नव्याने स्थान देऊन गंभीर धोरणात्मक चूक केली आहे. यामुळे प्रोत्साहन मिळालेली अस्साद राजवट तसेच रशिया आणि इराणला सामान्य नागरिकांची हत्या आणि आखात अस्थिर करण्याचे सत्र कायम ठेवेल’, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. यामुळे अमेरिकेचे बायडेन प्रशासन आणि अरब देशांमधील मतभेद पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहेत.

सिरियाला संघटनेत सामील करुन अरब लीगने गंभीर धोरणात्मक चूक केली - अमेरिकेचा अरब लीगला इशारागेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबिया, युएई, जॉर्डन व इराक या अरब देशांनी सिरियातील अस्साद राजवटीबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी हालचाली वाढविल्या होत्या. जॉर्डनची राजधानी अम्मान येथे सिरियाबरोबर प्रमुख अरब देशांच्या प्रतिनिधींची बैठकही पार पडली होती. यानंतर पुढच्या काही तासातच ‘अरब लीग’ने सिरियाला पुन्हा संघटनेत प्रवेश दिल्याची घोषणा केली. सिरिया तसेच इराणने अरब लीगच्या या घोषणेचे स्वागत केले. पण अमेरिकेने अरब लीगच्या या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत.

‘अरब देशांच्या सिरियाबाबतच्या या निर्णयाचे अमेरिका समर्थन करणार नाही. अरब लीगमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सिरियाने काहीही चांगले केलेले नाही, असे अमेरिकेचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे काही झाले तरी अमेरिका अस्साद राजवटीबरोबर संबंध सुधारणार नाही. तसेच अमेरिकेच्या मित्र व सहकारी देशांनी घेतलेल्या या निर्णयाचे अजिबात समर्थन करता येणार नाही’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्र धोरणविषयक समितीचे अध्यक्ष माईक मॅक्कॉल यांनी परखड शब्दात अरब देशांना इशारा दिला.

सिरियाला संघटनेत सामील करुन अरब लीगने गंभीर धोरणात्मक चूक केली - अमेरिकेचा अरब लीगला इशारासिरियाला संघटनेत पुन्हा प्रवेश देऊन अरब लीगने गंभीर धोरणात्मक चूक केल्याचे मॅक्कॉल यांनी बजावले. त्याचबरोबर सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद यांच्यात कोणत्याही स्वरुपाचा फरक पडलेला नाही. अस्साद राजवटीकडून आजही सिरियन जनतेवरील अत्याचार सुरू असल्याचा आरोप मॅक्कॉल यांनी केला. पण लवकरच राष्ट्राध्यक्ष अस्साद यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल, असा इशारा मॅक्कॉल यांनी दिला.

याआधीच अमेरिका व अरब मित्रदेशांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सिरियाला अरब लीगमध्ये सामील करुन सौदी व इतर अरब मित्रदेशांनी अमेरिकेला दुखावल्याचे दिसत आहे. यानंतरही अरब देशांबरोबर आपले मतभेद नसल्याचा दावा अमेरिका करीत आहे. अजूनही अमेरिका व अरब सहकारी देश सिरियाबाबत समान उद्दिष्टांवर काम करीत असल्याचे पटेल म्हणाले. पण त्यांनी सिरियाबाबत केलेली विधाने वेगळा संदेश देत आहे.

दरम्यान, अमेरिका अरब लीगमधील सिरियाच्या समावेशावर अशी प्रतिक्रिया देत असताना, संयुक्त राष्ट्रसंघाने अस्साद राजवटीला धक्का दिला. रासायनिक शस्त्रास्त्रांची विल्हेवाट लावण्याबाबत सिरियाने अजूनही २० मुद्यांवर समाधानकारक काम केलेले नाही, असा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. अस्साद राजवटीने आपल्या विरोधकांवर रासायनिक शस्त्रांचा प्रयोग केला होता, असा आरोप राष्ट्रसंघ व मानवाधिकार संघटनेनी केले होते. अस्साद राजवटीने आपल्यावरील हे आरोप नाकारले होते.

तुर्की-सिरिया संबंध सुधारण्यासाठी रशियामध्ये विशेष बैठक सुरू

इस्तंबूल/मॉस्को – अरब लीगने सिरियाबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्यानंतर तुर्की व सिरियामधील संबंध सुधारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी रशियामध्ये विशेष बैठक सुरू आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू या बैठकीत सहभागी झाले आहेत. मॉस्कोमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत लवकरच इराण व सिरियाचे परराष्ट्रमंत्री देखील सहभागी होतील.

सिरियाला संघटनेत सामील करुन अरब लीगने गंभीर धोरणात्मक चूक केली - अमेरिकेचा अरब लीगला इशारा२०११ साली सिरियातील अस्साद राजवटीच्या विरोधात अमेरिकेने सुरू केलेल्या संघर्षात नाटोचा सदस्य देश असलेल्या तुर्कीनेही सहभाग घेतला होता. पण नंतरच्या काळात तुर्कीने नाटोपासून दूर जाऊन अस्साद राजवटीविरोधी कारवाया हाती घेतल्या.

सिरियातील कुर्द बंडखोर तुर्कीच्या सुरक्षेला आव्हान ठरत असल्याचा आरोप करुन तुर्कीने सिरियाच्या उत्तरेकडील भागात लष्कर घुसविले. तसेच येथील कुर्दांच्या इंधनसंपन्न ठिकाणांचा तुर्कीने ताबाही घेतल्याच्या बातम्या आल्या होता. सिरियातील अस्साद राजवटीबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या रशिया व इराणने तुर्कीबरोबर त्रिपक्षीय चर्चा करुन सिरियात संघर्षबंदी लागू केली होती. पण काही महिन्यातच तुर्कीने ही संघर्षबंदी मोडून सिरियात पुन्हा हल्ले सुरू केले होते. त्यामुळे सिरियामध्ये अस्साद राजवट विरोधात तुर्की असा संघर्ष भडकला होता. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून आखातातील राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत.

हिंदी English

 

leave a reply