लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन ‘कोव्हिड हॉस्पिटल्स’ उभारली

श्रीनगर – कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवरील उपचारासाठी भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन हॉस्पिटल्स उभारली आहेत. अवघ्या १५ दिवसांच्या विक्रमी वेळेत लष्कराने ही दोन्ही हॉस्पिटल्स उभी केली आहेत. ‘ऑपरेशन नमस्ते’अंतर्गत लष्कर जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे. या हॉस्पिटल्सची उभारणी हा त्यातील महत्त्वाचा भाग ठरतो.

जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोनाव्हायरसने आठ जणांचा बळी घेतला आहे. तर या साथीची लागण झालेल्यांची संख्या ७४१वर पोहोचली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ही साथ वेगाने फैलावत असताना भारतीय लष्कर जनतेच्या मदतीला धावून आले आहे. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दोन कोव्हिड हॉस्पिटल्स उभारली. लष्कराच्या ओल्ड एअर फिल्ड मिलिट्री स्टेशनवर लष्कराने २०० बेड्सचे हॉस्पिटल उभारले आहे. तर जम्मूच्या आर्मी पब्लिक स्कूल इथे १०० बेड्सचे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटल्समध्ये लॅब, एक्सरे विभाग यासारख्या अनेक आधुनिक सोयी सुविधा असल्याचे लष्कराने स्पष्ट केले.

तसेच केंद्र सरकारच्या नियमावलीनुसारच ही हॉस्पिटल्स उभारण्यात आली आहेत. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर कोरोनाव्हायरस विरोधी लढ्यात देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच डॉ. सिंग यांनी सोशल मीडियावर लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये उभारलेल्या हॉस्पिटल्सचे फोटोग्राफ्स देखील शेअर केले आहेत. जम्मू आणि काश्मीर मध्ये भारतीय लष्कर व प्रशासन कोरोनाच्या रुग्णांसाठी अशा रीतीने युद्धपातळीवर प्रयत्न करीत असताना, पाकिस्तानव्याप्त काश्मीर मध्ये मात्र या साथीने हाहाकार उडाला आहे. पीओके मधील जनतेला आरोग्यविषयक सोयीसुविधा पुरविण्याच्या ऐवजी पाकिस्तान इथे कोरोनाचे रुग्ण धाडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याविरोधात स्थानिकांनी निदर्शने देखील केली होती .

पीओके मधील स्थानिकांना अल्पसंख्यांक बनवून पाकिस्तानच्या इतर प्रांतातील नागरिकांना इथे बसविण्याचे कुटिल कारस्थान पाकिस्तानच्या सरकारने आखले आहे. म्हणूनच कोरोनाव्हायरसची साथ पसरत असताना पाकिस्तानचे लष्कर पीओके मध्ये कोरोनाच्या रुग्णांना धाडत असल्याचे दिसते.

leave a reply