परदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदल व वायुसेना सज्ज

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यानुसार भारतीय नौदल ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ आणि भारतीय वायुसेना ‘वंदे भारत’ या मोहीमेद्वारे ७ ते १३ मे या कालावधीत परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी घेऊन येईल. याकरिता सोमवारी रात्री नौदलाच्या तीन युद्धनौका मालदीव आणि दुबईसाठी रवाना झाल्या आहेत.

सोमवारी रात्री मुंबईतील नौदलाच्या तळावर तैनात असलेल्या आयएनएस जलाश्व, आयएनएस मगर या युद्धनौका मालदीवला रवाना झाल्या. या युद्धनौका ८ मे रोजी भारतात पुन्हा दाखल होतील. आयएनएस जलाश्व आणि आयएनएस मगर ह्या दोन्ही ॲम्फिबिअस युध्दनौका आहेत. या जहाजांमधून एकाच वेळी सुमारे हजार जणांना आणले जाऊ शकते.

मालदीवमधील भारतीय दूतावास या भारतीयांना परत आणण्यासाठी त्यांची यादी तयार करीत आहे. तर मालदीव सरकार वैद्यकीय तपासणी करून या भारतीयांना सोडणार आहे. या सर्वांसाठी जहाजांमध्ये वैद्यकीय सुविधांसह सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तर दुबईला ‘आयएनएस शार्दुल’ पाठविण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौका भारतीयांना घेऊन कोची बंदरात दाखल होतील. कोचीमध्ये या सर्वांची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली.

कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे हजारो भारतीय त्या-त्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. त्यात आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. गेल्या आठवड्यातच नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याची तयारी पूर्ण झाल्याचे म्हटले होते.

वायुसेनेने भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सुमारे ६४ विमाने ठेवली आहेत. यातून १४८०० भारतीयांना मायदेशी आणले जाईल. यातील दोन विमाने ७ मे रोजी संयुक्त अरब अमिरातीसाठी (युएई) रवाना होतील. यातील एक विमान अबूधाबीहून भारतीयांना घेऊन कोचीकडे येईल, तर दुसरे विमान दुबईवरून कोझिकोडला जाईल. या उड्डाणांपूर्वी प्रवाशांची तपासणी केली जाईल व ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतील त्यांनाच पुढचा प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. त्याबरोबर या सर्वांना प्रवासादरम्यान आरोग्य मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

leave a reply