सिरियातील इराणच्या लष्करी तळावरील हल्ल्यांमध्ये १५ ठार

दमास्कस – सिरियाच्या पूर्वेकडील भागात झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये १५ जण ठार झाले. ‘देर अल-झोर’ येथील इराणच्या लष्करी तळाला लक्ष्य करून सदर हल्ले चढविल्याची माहिती सिरियातील मानवाधिकार संघटना देत आहेत. याशिवाय इस्रायली लष्कराने सिरियन राजधानी दमास्कस येथे हल्ले चढविले आहेत. इस्रायल व सिरियाच्या सीमेजवळ निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिले जाते.

Syriaपूर्व सिरियाच्या ‘देर अल-झोर’ येथील अबु कमाल शहरातील ’इमाम अली’ या लष्करी तळावर सोमवारी हवाई हल्ले झाले. पहाटे पाच वाजता सुरू झालेले हे हल्ले सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होते, अशी माहिती मानवाधिकार संघटनांनी दिली. सदर तळावर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जवान तसेच इराणसंलग्न दहशतवादी देखील तळ ठोकून होते. या हल्ल्यांमध्ये १५ दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण इराकच्या सीमेजवळ झालेल्या या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा मानवाधिकार संघटनेने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे.

या हल्ल्यानंतर अल-बुकमल शहरातील इराणी लष्कराची तैनाती वाढविल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर इराकमधील इराणसंलग्न दहशतवाद्यांना सिरियातील लष्करी तळावर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिरियन लष्कराने या हवाई हल्ल्याबाबत प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. पण इराणी लष्करी तळावर झालेल्या या हवाई हल्ल्यांसाठी अमेरिका जबाबदार असल्याचा दावा सिरियन माध्यमे करीत आहेत. याआधीही अमेरिकेने सदर तळावर हल्ले चढविले होते.

Syriaया हल्ल्याच्या काही तासानंतर इस्रायली लष्कराने सोमवारी रात्री सिरियन राजधानी दमास्कसजवळील हवाई तळावर हल्ले चढविले. या हल्ल्यात सिरियन तळाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. या हल्ल्यात विमानभेदी तोफा, नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त केल्याची माहिती इस्रायली लष्कराने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. गोलानमधील घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले. दोन दिवसांपूर्वी सिरियातून इस्रायलच्या गोलान टेकड्यांमध्ये घुसखोरी करणार्‍या चार दहशतवाद्यांना इस्रायलने ठार केले होते.

leave a reply