‘युएन’मधील भारतीय राजदूतांची पाकिस्तानला जोरदार चपराक

संयुक्त राष्ट्रसंघ – संयुक्त राष्ट्रसंघात जम्मू- काश्मीर मुद्दा वारंवार उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय राजदूतांनी सणसणीत चपराक लगावली. चीन वगळता जगातील सर्वच देशांनी काश्मीर प्रश्न द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य करून भारताची बाजू घेतली आहे, याची आठवण संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टी. एस. त्रिमूर्ती यांनी पाकिस्तानला करून दिली. पण वारंवार तोच मुद्दा उपस्थित करून या प्रश्नांचे आंतरराष्ट्रीयकरण करू पाहणारा पाकिस्तान प्रत्येकवेळी तोंडघशीच पडला आहे आणि भविष्यातही तोंडघशी पडत राहील. पाकिस्तानचे हे प्रयत्न कधीच यशस्वी ठरणार नाहीत, असा जोरदार टोला त्रिमूर्ती यांनी लगावला.

UNगेल्या महिन्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘कोविड-१९ नंतरचा बहुपक्षवाद’ या विषयावर बोलतानाही काश्मीर मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे काश्मीर मुद्द्याचे अतंरराष्ट्रीयकरण करण्याचे प्रयत्न काही नवे नाहीत. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यश मिळणार नाही, असे त्रिमूर्ती यांनी पाकिस्तानला फटकारले. गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या महसचिवांनी १९७२ च्या सिमला कराराचा उल्लेख करीत पाकिस्तानने कसलीच पूर्तता केली नसल्याचे म्हटले होते, याची आठवण त्रिमूर्ती यांनी करून दिली.

तसेच १९६५ सालानंतर या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची औपचारिक बैठक झाली नाही. गेल्यावर्षी एक अनौपचारिक बैठक झाली. मात्र त्यातून एकच स्पष्ट झाली चीन सोडल्यास प्रत्येक देशाने हा मुद्दा द्विपक्षीय असल्याचे स्वीकारल्याचे त्रिमूर्ती म्हणाले. यातून भारतीय राजदूतांनी पाकिस्तान-चीन संबंध अधोरेखित केले.

याशिवाय पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना मदत करते, असे थेट आरोप त्रिमूर्ती यांनी केले. पाकिस्तानमध्ये ४० हजार दहशतवादी सक्रीय आहेत आणि ते शेजारी देशांवर हल्ले चढवितात, याची कबुली पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली होती. याकडे त्रिमूर्ती यांनी लक्ष वेधले. इतकेच नाही तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातूनही पाकिस्तानवर ताशेरे ओढण्यात आले होते, हे सुद्धा त्रिमूर्ती यांनी अधोरेखित करून सांगितले.

दरम्यान, गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाची दहशतवादविरोधी व्हर्च्युअल बैठक पार पडली होती. या बैठकीतही भारताने पाकिस्तानचे वाभाडे काढले होते. लादेनला शहीद मानणांऱ्यानी दहशतवादावर उपदेश देऊ नये, असे भारताने पाकिस्तानला ठणकावले. सारे जग कोरोनाव्हायरसचा सामना करीत आहे. पण पाकिस्तानची दहशतवादी कारस्थाने सुरु आहेत, असा टोला भारताने पाकिस्तानला लगावला होता.

leave a reply