मतभेदांचे वादात रूपांतर होऊ देऊ नका – चीनची भारताकडून अपेक्षा

बीजिंग – सीमेवरील परिस्थितीला आणि द्विपक्षीय संबंधांना वेगळे करून पाहता येणार नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. यातून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिलेला संदेश चीनला मिळाल्याचे दिसत आहे. कारण यावर चीनकडून प्रतिक्रिया आली असून मतभेदांचे रूपांतर वादात होणार नाही, याची काळजी भारत घेईल, अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे. तसेच द्विपक्षीय हितसंबंध जपण्यासाठी भारत चीन बरोबर एकत्र काम करेल, अशी अशाही चीनने व्यक्त केली.

वादात रूपांतर

दोनच दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सीमेवरील तणावामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणारा खरमरीत संदेश चीनला दिला होता. सीमेवरील चीनच्या हालचालींचा परिणाम व्यापारावर होणे साहजिक आहे आणि भारताला चीनबरोबर मुकाबल्यासाठी खडे ठाकावेच लागेल, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. यातून भारत सीमाप्रश्नी मागे हटणार नसून यासाठी कठोरातले कठोर निर्णय भारत घेईल. यासाठी द्विपक्षीय संबंधांची पर्वा करणारा नाही, असा संदेश परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मंगळवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ”दोन सर्वात मोठ्या विकसनशील देश आणि अर्थव्यवस्थांमधील सहकार्य दोन्ही देशांच्या विकासासाठी आवश्यक आहे. तसेच स्थैर्य आणि जागतिक शांती व भरभराटीसाठी सकारात्मक ऊर्जा असल्याचे वेणबीन म्हणाले. त्यामुळे दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधात सीमा प्रश्न योग्य ठिकाणी ठेवावेत आणि मतभेद वादात रूपांतरित होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा वेनबीन यांनी व्यक्त केली.

”भारतात चीनमधून निर्यात केली जाणारी उत्पादने भारतातील मागणीला पूरक आहेत. भारतीय नागरिकांच्या आवश्यकता पूर्ण करणाऱ्या आहेत. दोन्ही देशांमधील व्यवहारिक सहकार्य परस्पर फायद्याचे आहे. त्यामुळे हे सहकार्य तोडण्याचा प्रयत्न करणे भारताच्या हिताचे नसल्याचा सल्ला यावेळी वेनबीन यांनी देण्याचा प्रयत्न केला.

या प्रतिक्रियेतून भारत देत असलेल्या आर्थिक दणक्यांची ढग चीनला जाणवू लागल्याचे दिसत आहे. भारताला जागतिक पातळीवर मिळणारे समर्थन आणि भारत चीनला आर्थिक आघाडीवर देत असलेल्या धक्क्यांची जागतिक पातळीवर घेतली नोंद चीनला अस्वस्थ करीत आहे. चीनच्या विरोधात खडे ठाकण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती भारताने दाखवून दिली आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देश भारताकडून प्रेरणा घेतील, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा कौन्सिलच्या अध्यक्षा लिसा कर्टीस यांनी नुकतेच म्हटले होते. यापार्श्वभूमीवर चीनची ही प्रतिक्रिया भारताच्या आक्रमकतेने चीन किती अस्वस्थ झाला आहे, हे अधोरेखित करीत आहे.

leave a reply