युक्रेनच्या युद्धाचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरही परिणाम होईल

- युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांचा इशारा

नवी दिल्ली – युक्रेनचे युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असतानाच, भारताचा ‘रायसेना डायलॉग’ हा सुरक्षविषयक परिसंवाद सुरू झाला आहे. त्यामुळे भारताच्या या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात युक्रेनच्या युद्धाचे पडसाद उमटले आहेत. यात सहभागी झालेल्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा ‘उर्सूला व्हॅन देर लियान’ यांनी युक्रेनच्या युद्धामुळे रशियापासून युरोपियन देशांना धोका असल्याचे बजावले आहे. त्याचवेळी युक्रेनच्या युद्धाचे परिणाम इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही पहायला मिळतील, असे सूचक उद्गार देर लियान यांनी काढले आहेत.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रायसेना डॉयलॉगच्या सुरूवातीलाच युरोपिय महासंघाने दाखविलेल्या धोरणात्मक पातळीवरील सजगतेची प्रशंसा केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानांचा सामना करताना, दुसऱ्या कुणापेक्षाही युरोपिय महासंघाने अधिक तत्परता व धोरणात्मक पातळीवरील सजगता दाखविली, अशा शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी महासंघाची प्रशंसा केली. महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही इतकी धोरणात्मक सजगता दाखविता आलेली नाही, हे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी याद्वारे लक्षात आणून दिले आहे. विशेषतः चीनच्या वर्चस्ववादी धोरणांमुळे निर्माण झालेली अस्थिरता लक्षात घेऊन युरोपिय महासंघाने चीनबरोबरील आपले व्यापारी सहकार्य रोखले होते. त्याचा दाखला परराष्ट्रमंत्री जयशंकर देत असल्याचे संकेत मिळत आहेत.

याबरोबरच भारताच्या युरोपिय महासंघाबरोबरील सहकार्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी स्वागत केले. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या भारताच्या संकल्पनेचे युरोपिय महासंघाने स्वागत केले होते. यावरून भारतावर युरोपिय महासंघाने दाखविलेला विश्वास जगासमोर आला होता. 2015 साली सुरू झालेल्या या प्रक्रियेला सात वर्षे पूर्ण होत आहेत, याची आठवण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करून दिली. यातील महासंघाच्या सहभागाचीही जयशंकर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.

भारत व युरोपिय महासंघामध्ये सहकार्य अधिक व्यापक होत असतानाच, रशियाबाबत भारत व महासंघाचा दृष्टीकोन वेगळा असल्याचेही रायसेना डायलॉगच्या पार्श्वभूमीवर उघडझाले आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा ‘उर्सूला व्हॅन देर लियान’ यांनी युक्रेनच्या युद्धाचा दाखला देऊन रशियापासून संभवणाऱ्या धोक्याचा इशारा दिला. कारण नसताना रशियाने युक्रेनवर हल्ला चढविलेला आहे. या युद्धाचे भयंकर परिणाम समोर येत असून युक्रेनच्या रस्त्यावर पडलेले मृतदेह या भयावह युद्धाचा संहार आपल्यासमोर मांडत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडविले आहेत, अशी जळजळीत टीका यावेळी देर लियान यांनी केली. तसेच इतर युरापियन देशांनाही रशियाच्या आक्रमणाचा धोका संभवतो, असे देर लियान यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या युद्धात तटस्थ भूमिका स्वीकारणाऱ्या भारतालाही युरापियन कमिशनच्या अध्यक्षांनी सूचक शब्दात इशारा दिला. युक्रेनच्या युद्धाचे परिणाम इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही होतील, असे उर्सूला व्हॅन देर लियान यांनी बजावले आहे. अमेरिका व पाश्चिमात्य देशांचे लक्ष युक्रेनच्या युद्धाकडे लागलेले असताना, चीन याचा लाभ घेऊन तैवानवर हल्ला चढविल, असा इशारा विश्लेषक देत आहेत. त्याचवेळी युक्रेनच्या आघाडीवर गुंतलेली अमेरिका व युरोपिय देश तैवानवरील चीनचा हल्ला रोखू शकणार नाहीत. यामुळे चीनला मोकळे रान मिळेल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांनाही चीनच्या आक्रमकतेचा फटका बसेल. भारतही यापासून अलिप्त राहू शकणार नाही. भारताच्या सुरक्षेला बेताल बनलेल्या चीनकडून गंभीर आव्हान मिळेल, असे संकेत उर्सूला व्हॅन देर लियान यांच्या विधानांमधून मिळत आहेत.

leave a reply