बलोचिस्तान व उत्तर वझिरीस्तानमधल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे १४ जवान ठार

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या बलोचिस्तान आणि उत्तर वझिरीस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या १४ जवानांसह एकूण २१ जण ठार झाले. बलोचिस्तानमधल्या हल्ल्याची जबाबदारी ‘बलोच राजी आजोई संगार’ (बीआरएस) या बंडखोरी संघटनेने स्वीकारली आहे. तर उत्तर वझिरीस्तानमधल्या हल्ल्यात ‘तेहरिक-ए-तालिबान’चा हात असल्याचे सांगितले जाते.

उत्तर वझिरीस्तान

‘ऑईल गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड’च्या (ओजीडीसीएल) कामगारांच्या कामगारांना सुरक्षा पुरविणारा पाकिस्तानी फ्रंटिअर कोरच्या जवानांचा ताफा ग्वादरहून कराचीकडे निघाला होता. त्यावेळी ‘बीआरएस’च्या बंडखोरांनी सुरक्षादलाच्या ताफ्यावर भीषण हल्ला चढविला. यामध्ये पाकिस्तानी फ्रंटिअर कोरचे आठ जवान ठार झाले. तसेच ओजीडीसीएल कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एकूण १५ जणांचा बळी यामध्ये गेला आहे. तसेच काही जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी लष्कर बलोचींचे हत्याकांड घडविते. प्रकल्पांच्या नावाखाली बलोचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करीत असल्याचा आरोप बीआरएस’च्या प्रवक्त्याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना केला. ‘ओजीडीसीएल’ बलोचिस्तानच्या ग्वादर, खरान, पासनी या भागात नव्या प्रकल्पांच्या नावाखाली इंधनाचे उत्खनन करीत आहे. या प्रकरणी त्यांना अनेकवार इशारा देऊनही त्यांनी काम सुरु ठेवले होते. बलोचिस्तान बलोच जनतेचे आहे. तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर बलोचींचां हक्क असल्याचे ‘बीआरएस’च्या प्रवक्त्याने ठणकावून सांगितले.

उत्तर वझिरीस्तान

‘ओजीडीसीएल’ने तातडीने हे काम थांबवावे असा इशारा ‘बीआरएस’ने दिला. तसेच चीनच्या मदतीने पाकिस्तान उभारीत असलेल्या प्रकल्पांनाही बलोच जनतेचा विरोध आहे. बलोचिस्तान स्वतंत्र होईपर्यंत पाकिस्तानच्या लष्करावर हल्ले होत राहतील, असा इशारा ‘बीआरएस’ने दिला. पाकिस्तानच्या लष्कराने या हल्ल्याचा निषेध केला असून यामध्ये बलोचिस्तानचा विकास रखडत असल्याचे त्यांनी विधान केले.

दरम्यान, एकाच दिवशी पाकिस्तानच्या लष्कराला दोन हादरे बसले. पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमध्ये रझमाकजवळ पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला ‘आयईडी’ स्फोटकाने उडविण्यात आले. यामध्ये पाकिस्तानचे सहा जवान ठार झाले. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी होते. ‘तेहरिक- ए-तालिबान पाकिस्तान’ने हा हल्ला घडविल्याचा दावा केला जातो. पाकिस्तानच्या वझिरीस्तान सीमाभागात दहशतवादी संघटंना सक्रीय आहेत. या संघटनांचा पाकिस्तानने बिमोड केल्याचे सांगितले तरी या संघटना येथे तळ ठोकून आहेत. त्यामुळे उत्तर वझिरीस्तान भागात संघर्ष सुरुच असतो.

दोनच दिवसांपूर्वी उत्तर वझिरीस्तानमध्ये बॉर्डर पोस्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे दोन जवान ठार झाले होते. तर गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या लष्कराने उत्तर वझिरीस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत दहशतवादी संघटनांचा कमांडर ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण ही कारवाई ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या(एफएटीएफ)कारवाईपासून वाचण्यासाठी केली असल्याचे सांगितले जात होते.

leave a reply