इराणच्या बंदर आणि बँकिंग क्षेत्रावर सायबर हल्ले

तेहरान – इराण सरकारशी संलग्न असलेल्या बंदर आणि बँकिंग क्षेत्रावर नुकतेच सायबर हल्ले झाले. इराणने या दोन्ही सायबर हल्ल्यांची कबुली दिली. पण या सायबर हल्ल्यांसाठी कुठल्याही देशावर किंवा संघटनेवर आरोप करण्याचे इराणने टाळले आहे. गेल्या काही महिन्यांपासून इराणमध्ये संशयास्पद स्फोट व आग भडकण्याची मालिका सुरू आहेत. या घटनांसाठी इराणने कुणालाही दोष देणे टाळल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते. या सायबर हल्ल्यांबाबतही इराणने पुन्हा तसेच धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.

सायबर हल्ले

गेले दोन दिवस, मंगळवार आणि बुधवारी इराणमध्ये मोठे सायबर हल्ले झाल्याची माहिती इराणच्या माध्यमांनी सर्वप्रथम दिली. या सायबर हल्ल्यांमध्ये इराणच्या बंदर आणि बँकिंग क्षेत्राला लक्ष्य केल्याचा दावा यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी इराणच्या सरकारने या सायबर हल्ल्यांविषयी खुलासा केला. इराणच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवर सायबर हल्ले झाल्याचे इराणच्या सरकारने मान्य केले. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव काही सरकारी क्षेत्रांच्या ऑनलाईन सेवा बंद करण्यात आल्याचे इराण सरकारने स्पष्ट केले. पण या क्षेत्रांची माहिती उघड करण्याचे इराणच्या सरकारने टाळले.

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदर अब्बास येथील कॉम्प्युटर सिस्टिमवर सायबर हल्ले झाले. या हल्ल्यामध्ये बंदर अब्बासवरील कामकाज ठप्प झाले होते. याआधी मे महिन्यातही याच बंदरावर सायबर हल्ले झाले होते. सदर बंदरावरुन इराण हिजबुल्लाह आणि हमासला शस्त्रसाठा पुरवित असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता. इस्रायली नौदलाने हा शस्त्रसाठा नेणार्‍या काही जहाजांवर कारवाईही केली होती. त्यामुळे बंदर अब्बास सायबर हल्ल्याचे लक्ष्य ठरल्याचे बोलले जात होते. यावेळेसही याच कारणस्तव बंदर अब्बासवर सायबर हल्ले झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. पण इराणच्या सरकारने या सायबर हल्ल्यांसाठी कुठल्याही संघटना किंवा देशावर आरोप करणे टाळले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इराणवर सायबर हल्ले सुरू असल्याची माहिती इराण सरकारने दिली.

याआधी इराणने आपल्यावरील सायबर हल्ल्यांसाठी थेट इस्रायल आणि अमेरिकेला दोषी धरले होते. २०१० साली इराणच्या अणुकार्यक्रमावर स्टक्सनेट व्हायरसचा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पातील हजारो सेंट्रीफ्यूजेस निकामी होऊन इराणचा अणुकार्यक्रम पाच वर्षांनी मागे गेला होता. या सायबर हल्ल्यासाठी इराणने इस्रायल व अमेरिकेवर आरोप केले होते. तर गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या अराम्को कंपनीच्या इंधन प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्यांसाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप करुन अमेरिकेने इराणवर सायबर हल्ले केले होते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून इराणमध्ये संशयास्पद स्फोट, आगीच्या घटना घडत आहेत. यापैकी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या संशयास्पद स्फोटाचा व त्यानंतर लागलेल्या आगीचाही समावेश आहे. या स्फोटामागे सायबर हल्ला व इस्रायल असल्याचा आरोप अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी केला होता. पण इराणने सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळून इस्रायलवर आरोप करण्याचे टाळले होते.

leave a reply