‘ड्रोन’ हल्ल्यांविरोधात काश्मीरमध्ये तैनात सैनिकांना विशेष प्रशिक्षण

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर व काश्मीरमधील दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांकडून ड्रोनद्वारे ग्रेनेड हल्ले होऊ शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराकडून जवानांना ड्रोन हल्ले परतविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

विशेष प्रशिक्षण

भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले आहे. १५ कोर बॅटल स्कूलमध्ये जवानांना प्रशिक्षक देण्यात येईल. याच ठिकाणी जवानांना युद्ध कारवायांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. आता या ठिकाणी संभाव्य ड्रोन हल्यांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात येणाऱ्या लष्करातील अधिकारी आणि जवानांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. सीमेववर तैनात असलेल्या जवानांना १४ दिवस आणि दहशतवाद्यांविरोधात कारवाईत सहभागी असलेल्या जवानांना २८ दिवसांचा प्रशिक्षण कालावधी असेल. या प्रशिक्षणामुळे काश्मीरमध्ये तैनात जवानांना मोठ्या प्रमाणात मदत मिळेल, असा दावा केला जातो.

विशेष प्रशिक्षण

जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी सध्या दहशतवादी संघटनांकडून ड्रोन्सचा वापर होत असल्याचे गेल्या काहीं महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. पंजाब आणि काश्मीरमधील सीमेवर काही ड्रोन सुरक्षादलांकडून पाडण्यात आली आहेत. मात्र सध्या दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करणे अवघड बनले आहे. तसेच सुरक्षादलांच्या जोरदार कारवाईमुळे दहशतवादी मारले जात आहेत. यामुळे ‘आयएसआय’कडून ड्रोनचा वापर करण्याची योजना आखाण्यात आली आहे. घुसखोरीच्यावेळी सुरक्षादलाचा जवानांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना ड्रोन हाताळण्याचे देखील प्रशिक्षण देत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आणि जवानांना ड्रोन पाडण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ड्रोन व ‘अँटी ड्रोन सिस्टिम’च्या खरेदीचा प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply