गिलगिट-बाल्टिस्तान गिळंकृत करण्याचा प्रयत्‍न पाकिस्तानला महाग पडेल

-‘पीओके’च्या आजी-माजी पंतप्रधानांचा इशारा

हुंजा – गिलगिट-बाल्टिस्तानचा पाकिस्तानमध्ये समावेश करुन पंतप्रधान इम्रान खान भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्‍न करीत आहे खरे. पण गिलगिट-बाल्टिस्तानसह पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) याला कडाडून विरोध होत आहे. आपल्या या निर्णयाला विरोध करणार्‍या पीओकेचे पंतप्रधान राजा फारूक हैदर यांना इम्रान खान यांच्या सरकारने गद्दार ठरविले आहे. पण पीओके’चे माजी पंतप्रधान असलेल्या सरदार आतिक खान यांनीही ‘गिलगिट-बाल्टिस्तान हा पाकिस्तानचा भूभाग नाही, तर तो काश्मीरचा हिस्सा आहे’, असे बजावले आहे. पाकिस्तानी विश्लेषकही गिलगिट-बाल्टिस्तानबाबत हा निर्णय घेऊन पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानला मोठ्या संकटात टाकल्याचा इशारा देत आहे.

पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याची घोषणा केली असून नोव्हेंबर महिन्यात ही निवडणूक होणार असल्याचा दावा केला जातो. या निवडणुकीनंतर गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानचा पाचवा प्रांत घोषित करण्यात येईल, असे पाकिस्तानच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. पण गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तान विलिन करण्याच्या इम्रान सरकारच्या योजनेच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीर तसेच गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये रान पेटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमधील जनता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन पाकिस्तान सरकार आणि लष्कराविरोधात निदर्शने करीत असल्याचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स प्रसिद्ध होत आहेत.

पीओकेचे पंतप्रधान राजा फारुक हैदर यांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे. त्यांच्यावर पाकिस्तानत देशद्रोहाचे आरोप सुरू झाले आहेत. माजी पंतप्रधान सरदार आतिक खान यांनी देखील इम्रान खान यांच्या या योजनेवर तोफ डागली. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार सोडविण्याचे भारत आणि पाकिस्तानने याआधी मान्य केले होते, याची आठवण सरदार आतिक यांनी करुन दिली. तरीही या भागात निवडणूक घेऊन पाकिस्तानात विलिन करण्याच्या योजनेमुळे पाकिस्तानची याआधीची भूमिका निकालात निघेल, असा इशारा सरदार आतिक यांनी दिला. भारताने याआधीच काश्मीरमध्ये लाखो काश्मीरी पंडितांच्या कुटूंबांना वसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानला पाचवा प्रांत घोषित केले, तर यापुढे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरातून काश्मीरप्रश्नी कधीच समर्थन मिळू शकणार नाही, याची जाणीव सरदार आतिक खान यांनी करुन दिली.

दरम्यान, गिलगिट बाल्टिस्तानला पाचवा प्रांत घोषित करण्याचा निर्णय हा पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात घेण्यात आलेला नाही. तर रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात घेण्यात आलाचा दावा ‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज’ या अभ्यासगटाने केला. पाकिस्तानच्या लष्कराने चीनच्या दबावाखाली येऊन ही खेळी रचल्याचेही या अभ्यासगटाने म्हटले आहे. याद्वारे पाकिस्तानचे लष्कर व सरकार गिलगिट-बाल्टिस्तान चीनच्या हाती सोपविण्याची तयारी करीत असल्याचा नवा आरोप सुरू झाला आहे. याचा भयंकर परिणामांची जाणीव झालेल्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या जनतेने पाकिस्तानी सरकार व लष्कराच्या विरोधात निर्णायक भूमिका घेण्याची तयारी केली आहे.

leave a reply