अमेरिकेची ‘युएसएस रोनाल्ड रिगन’ हिंदी महासागरात दाखल होणार

- १२ ऑक्टोबरला भारतीय नौदलाबरोबर 'पासएक्स' सराव पार पडणार

नवी दिल्ली – भारत आणि चीनमध्ये सातव्या टप्प्यातील लष्करी स्तरावरील चर्चा सुरू होण्यापूर्वी अमेरिकेतील विमानवाहू युद्धनौका युएसएस रोनाल्ड रिगन हिंदी महासागरात दाखल होण्यासाठी निघाली आहे. मलाक्काच्या सामुद्रिधुनीत युएसएस रोनाल्ड रिगन दिसून आल्याचे वृत्त आहे. पंधरा दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या नौदलाचे ‘पी८ पोसायडन’ हे पाणबुडी शोधक टेहळणी विमान अंदमान-निकोबारमधील विमानतळावर उतरले होते. त्यानंतर अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेचे आपल्या ताफ्यासह हिंदी महासागरातील प्रवेश चीनला दिलेला आणखी एक सामरिक इशारा ठरतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका हिंदी महासागरात दाखल होत आहे. याआधी जुलै महिन्यात अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका हिंदी महासागरात दाखल झाली होती. यावेळी भारत आणि अमेरिकेच्या नौदलामध्ये ‘पासएक्स’ नावाचा युद्धसरावही पार पडला होता. यानंतर आता साऊथ चायना सीमध्ये युद्धसरावांमध्ये भाग घेतल्यानंतर ‘युएसएस रोनाल्ड रिगन हिंदी महासागरात दाखल होत पुढील मोहिमेसाठी जाणार आहे.

‘युएसएस रोनाल्ड रिगन ‘ मलाक्काच्या समुद्रीधुनीमार्गे हिंदी महासागर क्षेत्रात दाखल होताच भारत आणि अमेरिकेच्या नौदलामध्ये ‘पासएक्स’ सराव होईल. १२ तारखेला हा सराव होणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे याच दिवशी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये लडाखमधील तणावावरून पुढील टप्प्यातील चर्चा होणार आहे. त्यामुळे चीनसाठी आणखी एक सुस्पष्ट संदेश या सरावात लपल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मलाक्काच्या सामुद्रीधुनीतून चीनचा ७० टक्के व्यापार होत असून हा मार्ग बंद झाल्यास चीनची कोंडी होऊ शकते. हे ओळखून भारताने मलाक्काच्या सामुद्रीधुनीनजीक आपली तैनाती वाढविली आहे. मलाक्काच्या सामुद्रीधुनीच्या मुखाशी असलेल्या अंदमान निकोबार क्षेत्रात इतर देशांबरोबर युद्धसराव होत आहेत. नुकताच ऑस्ट्रेलियाबरोबरही असाच युद्धसराव पार पडला होता. तसेच याआधी अमेरिका, जपान, फ्रान्सबरोबरही युद्धसरावचे आयोजन करण्यात आले होते. आता अमेरिकेबरोबर पुन्हा एकदा ‘पासएक्स’ सराव होणार आहे. या हालचाली चीनवरील दडपण वाढविणाऱ्या ठरत आहेत. तसेच आपण भारताच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेशही अमेरिका याद्वारे देत आहे.

leave a reply