राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अटकेचा प्रयत्न म्हणजे रशियाविरोधात युद्धाची घोषणा

- सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचा इशारा

मॉस्को – ‘कल्पना करा की एका अण्वस्त्रसज्ज देशाचा विद्यमान राष्ट्रप्रमुख जर्मनीसारख्या देशात जातो व त्या देशात त्याला अटक होते. असे घडले तर ही गोष्ट रशियाविरोधातील युद्धाची घोषणा ठरेल’, असा खरमरीत इशारा सिक्युरिटी कौन्सिलचे उपप्रमुख व माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. यावेळी त्यांनी अशी वक्तव्ये करणाऱ्या जर्मन नेत्यांचीही खिल्ली उडविली.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अटकेचा प्रयत्न म्हणजे रशियाविरोधात युद्धाची घोषणा - सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचा इशारागेल्या आठवड्यात युरोपस्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात युद्धगुन्हे दाखल करून अटक वॉरंट बजावले होते. या वॉरंटचे युक्रेनसह अमेरिका व युरोपिय देशांनी समर्थन केले आहे. गुन्हे न्यायालयाला मान्यता देणाऱ्या कोणत्याही देशाला पुतिन यांनी भेट दिल्यास त्या देशात त्यांना अटक होऊ शकते, असे दावेही पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत आहेत. रशियन नेत्यांनी यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले असून मेदवेदेव्ह यांचा इशारा त्याचाच भाग आहे.

मेदवेदेव्ह यांनी यापूर्वी हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालय रशियन क्षेपणास्त्रांचे लक्ष्य ठरु शकते, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर जर्मन नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना मेदवेदेव्ह यांनी थेट युद्धाचा इशारा दिला. रशियाची क्षेपणास्त्रे जर्मन संसदेसह चॅन्सेलरच्या कार्यालयांना लक्ष्य करतील, असे त्यांनी बजावले. रशियन वृत्तसंस्थांना दिलेल्या मुलाखतीत मेदवेदव्ह यांनी आण्विक विनाशाची शक्यता वाढल्याकडेही लक्ष वेधले.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अटकेचा प्रयत्न म्हणजे रशियाविरोधात युद्धाची घोषणा - सिक्युरिटी कौन्सिलचे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांचा इशारापाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला होणारा घातक शस्त्रांचा पुरवठा दररोज जगाला आण्विक विनाशाजवळ नेणारा ठरत आहे, असा इशारा रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिला. पाश्चिमात्यांकडून रशियाला तोडण्याचे प्रयत्न सुरू असून यात अमेरिका आघाडीवर असल्याचे मेदवेदेव्ह यांनी सांगितले. युनायटेड स्टेटस्‌‍ ऑफ अमेरिका हा रशियाचा शत्रू आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनीही वाढत्या आण्विक धोक्याकडे लक्ष वेधले. गेल्या काही दशकांचा विचार करता सध्या आण्विक संघर्षाचा धोका सर्वाधिक पातळीवर आहे, असे रिब्कोव्ह म्हणाले. त्याचवेळी रशिया अमेरिकेबरोबरील ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’वर सध्या तरी फेरविचार करण्याच्या स्थितीत नसल्याचेही त्यांनी बजावले.

हिंदी English

 

leave a reply