रशियाकडून युक्रेनमधील चार प्रांतांमध्ये सार्वमताची प्रक्रिया सुरू

युक्रेनसह पाश्चिमात्य देशांचे टीकास्त्र

ukraine-referendumमॉस्को – रशियाचे नियंत्रण असलेल्या युक्रेनच्या चार प्रांतांमध्ये सार्वमताची प्रक्रिया सुरू झाली आहे. डोन्बास क्षेत्राचा भाग असलेल्या लुहान्स्क व डोनेत्स्कसह खेर्सन तसेच झॅपोरिझिआमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यातील 27 तारखेपर्यंत हे मतदान सुरू राहणार असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी ही सार्वमताची प्रक्रिया म्हणजे बनाव असल्याची टीका केली असून आंतरराष्ट्रीय समुदाय त्याला कधीही मान्यता देणार नाही, असे बजावले आहे. सार्वमत सुरू असतानाच डोनेत्स्क व खेर्सन प्रांतात युक्रेनकडून हल्ले चढविण्यात आले आहेत. तर रशियाने इराणच्या ड्रोन्सचा वापर करून ओडेसा बंदरात हल्ले केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला.

russia referendumsसात महिन्यांपूर्वी युक्रेनमध्ये लष्करी मोहीम सुरू करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी डोन्बास प्रांतासह युक्रेनच्या इतर भागांमधील रशियन मूळ असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. युक्रेनची राजवट रशियन भाषिक जनतेवर अत्याचार करीत असून त्यांच्या सुरक्षेसाठी रशियाला लष्करी कारवाईचे पाऊल उचलावे लागले, असे पुतिन यांनी सांगितले होते. सात महिन्यात रशियाने डोन्बासमधील लुहान्स्क प्रांतावर पूर्ण ताबा मिळविला आहे. तर डोनेत्स्कसह दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातील 70 टक्क्यांहून अधिक भाग रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. युक्रेनने हे भाग पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी गेल्या महिन्यापासून प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. त्याला ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात यश मिळाले असले तरी इतर प्रांतांमध्ये फारसा प्रभाव पडलेला नाही.

Russia begins plebiscite processमात्र युक्रेनकडून प्रतिहल्ल्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन रशियाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. रशिया-युक्रेन सीमेवर असलेल्या व लष्करी मोहिमेत नियंत्रण मिळविलेल्या प्रांतांवर पूर्ण वर्चस्व मिळावे यासाठी रशियाने सार्वमताचे पाऊल उचलल्याचे दिसत आहे. 2014 साली रशियाने क्रिमिआ ताब्यात घेतल्यावरही सार्वमताच्या माध्यमातून आपली पकड अधिक घट्ट केली होती. त्याचीच पुनरावृत्ती करून युक्रेनमधील चार प्रांत रशियाला जोडण्याची तयारी पुतिन यांनी केल्याचे दिसत आहे. पुतिन यांच्या या कारवाईवर युक्रेनसह पाश्चिमात्य देशांमधून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

युक्रेन तसेच पाश्चिमात्य देशांनी सदर सार्वमत म्हणजे बनाव असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. सार्वमतासाठी रशियन लष्कर घराघरात जाऊन नागरिकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला. रशियाकडून दडपण व दबाव टाकून प्रक्रिया राबविण्यात येत असून युक्रेनी नागरिकांनी त्याला विरोध करावा, असे आवाहन युक्रेन सरकारने केले. तर ब्रिटन तसेच नाटोने युक्रेनमधील प्रांतांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सार्वमताला आंतरराष्ट्रीय समुदाय कधीही मान्यता देणार नाही, असे बजावले आहे.

शुक्रवारपासून सार्वमतासाठी मतदान सुरू झाले आहे. त्याचवेळी युक्रेनच्या लष्कराकडून डोनेत्स्क तसेच खेर्सन प्रांतात मोठे हल्ले सुरू झाले आहेत. रशियाकडून राबविण्यात येणाऱ्या सार्वमतात अडचणी याव्यात यासाठी हल्ल्यांची व्याप्ती वाढविण्यात येत असल्याचे मानले जाते. त्याचवेळी रशियानेही डोनेत्स्क तसेच दक्षिण युक्रेनमध्ये हल्ले केल्याचे सांगण्यात येते. रशियाने युक्रेनच्या ओडेसा बंदरावर ड्रोन हल्ला केला असून त्यासाठी इराणी ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

leave a reply