ऑस्ट्रेलिया कोणत्याही दडपणासमोर झुकणार नाही

- पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनला खडसावले

स्कॉट मॉरिसनकॅनबेरा/बीजिंग – ‘द्विपक्षीय संबंध कायम ठेवायचे असतील तर त्याबाबत चर्चा करताना कोणत्याही अटी ठेवता येणार नाहीत. याची स्पष्ट जाणीव चीनने ठेवावी. ऑस्ट्रेलिया माध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणेल किंवा देशात कोणी गुंतवणूक करावी यासंदर्भातील नियम गुंडाळून ठेवेल, अशा प्रकारच्या अपेक्षा ठेऊ नकात. ही गोष्ट फारशी शहाणपणाचीही ठरणार नाही, हे लक्षात ठेवा’, या शब्दात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपला देश चीनच्या कोणत्याही दडपणासमोर झुकणार नसल्याचे बजावले. गेल्या काही महिन्यांपासून चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात व्यापारयुद्ध छेडले आहे. ऑस्ट्रेलियातून आयात होणारे मासे, सागरी उत्पादने, कापूस, मांस, व वाईन यांच्यावर मोठ्या प्रमाणात आयात कर लादण्यात आले आहेत. हे स्कॉट मॉरिसनकर लादतानाच ऑस्ट्रेलियातून चीनच्या बंदरांमध्ये दाखल झालेली उत्पादने अनेक दिवसांपासून रोखूनही धरण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ आता ऑस्ट्रेलियातून आयात होणारा कोळसा ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताना चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने यापुढ चीन मंगोलिया, इंडोनेशिया व रशियाकडून कोळसा आयात करणार असल्याची माहिती दिली.

स्कॉट मॉरिसनऑस्ट्रेलियातून चीनमध्ये दरवर्षी सुमारे 14 अब्ज डॉलर्सच्या कोळशाची निर्यात होते. मात्र या वर्षात त्यात जवळपास 78 टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. गेले दोन महिने एक अब्ज डॉलर्सहून अधिक कोळसा असलेली 80हून अधिक ऑस्ट्रेलियन जहाजे चीनच्या बंदरांमध्ये उभी आहेत. मात्र त्यातून कोळसा उतरविण्यास चीनने नकार दिला आहे. त्यासाठी पर्यावरणीय निकष पूर्ण नसल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र प्रत्यक्षात हा चीनने छेडलेल्या व्यापारयुद्धाचा भाग असल्याचे ‘ब्लॅकलिस्ट’च्या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.

स्कॉट मॉरिसनगेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलियाने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामागे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून ऑस्ट्रेलियातील विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेला हस्तक्षेप व प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न कारणीभूत आहेत. हा प्रभाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले असून कायदेशीर व राजनैतिक पातळीवरही ठाम पवित्रा घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील या बदलाने चीन बिथरला असून आपल्याविरोधात घेण्यात आलेले निर्णय रद्द करावेत, नाहीतर परिणामांना तोंड देण्यास तयार रहावे, अशी धमकी दिली आहे.

मात्र चीनच्या धमक्यांपुढे झुकण्यास ऑस्ट्रेलियाने स्पष्टपणे नकार दिला असून पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. कोळशाची आयात रोखण्याच्या मुद्यावरही मॉरिसन यांनी चीनला उघड आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. चीनचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेचा नियमांचे उल्लंघन आहे आणि चीनव्यतिरिक्त जपान व भारत हे देशही ऑस्ट्रेलियाकडून कोळसा आयात करतात, असे ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी बजावले.

leave a reply