वेळीच रोखले नाही तर इराण जगासाठी धोकादायक ठरेल

- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

धोकादायक

जेरूसलेम – ‘निर्बंधांखाली दबलेला असूनही इराण शेजारी देशांसाठी धोकादायक ठरत आहे. अशा परिस्थितीत, इराणला निर्बंधांतून मुक्त केले तर येत्या काळात इराण आण्विक स्फोटकांनी सज्ज असलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज होईल. इराणची ही आण्विक क्षेपणास्त्रे अमेरिका आणि युरोपला लक्ष्य करतील व इराण जगासाठी घातक बनेल आणि प्रत्येकाला इराणपासून धोका संभवेल’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. इराणशी अणुकरार करण्याच्या तयारीत असलेल्या अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना उद्देशून इस्रायलच्या पंतप्रधानांनी हा इशारा दिल्याचा दावा केला जातो.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी नुकताच इस्रायलचा दौरा करून पंतप्रधान नेत्यान्याहू यांची भेट घेतली. अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येनंतर इराण अमेरिका व इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या धमक्या देत आहे. इराणच्या या धमक्यांमुळे आखातात तणाव निर्माण झाला आहे. अशा या तणावाच्या परिस्थितीत, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इस्रायलचा दौरा करणे महत्त्वाचे मानले जाते. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी देखील जागतिक शांततेला इराणकडून असलेला धोका लक्षात आणून देऊन आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इराणच्या राजवटीविरोधात कारवाईची मागणी केली.

धोकादायक

‘जोपर्यंत इराण आपल्या शेजारी देशांना धमकावत आहे, त्यांची कोंडी करीत आहे, इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देत आहे, आखाती तसेच जगभरातील दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करीत आहे आणि अण्वस्त्रांची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे; तोपर्यंत इराणशी कुठल्याही प्रकारचे व्यवहार सुरू करू नये’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत स्वीकारलेल्या भूमिकांचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्वागत केले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणवर अधिकाधिक दबाव वाढविण्याबाबत स्वीकारलेल्या भूमिकेमुळे आज थोडीफार शांती अनुभवयाला मिळत असल्याचा दावा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केला. पण अजूनही इराण आपल्या शेजारी देशांना धमकावत आहे. अशा परिस्थितीत, इराणवरील निर्बंध मागे घेतली तर येत्या काळात इराण अमेरिका आणि युरोपला लक्ष्य करू शकणार्‍या अण्वस्त्रसज्ज आंतरखंडिय क्षेपणास्त्रांनी सज्ज होईल, याची जाणीव पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी करून दिली. त्याचबरोबर जागतिक सुरक्षेसाठी धोका ठरलेल्या या इराणविरोधात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले.

धोकादायक

इस्रायलच्या पंतप्रधानांनी यावेळी इराण वगळता कुठल्याही देशाचा उल्लेख केला नाही. पण इराणशी पुन्हा अणुकरार करण्याच्या तयारीत असलेले अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच युरोपिय देशांसाठी इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा इशारा होता, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. बायडेन यांनी इराणच्या अणुकरारावर सशर्त चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे. तर इराणने देखील अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चेसाठी तयार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलच्या पंतप्रधानांनी बायडेन प्रशासनाला सावध केल्याचे दिसते. सौदी अरेबियाने देखील इराणच्या अणुकार्यक्रमाबाबतच्या चर्चेत अमेरिकेने आखाती देशांनाही सामील करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.

leave a reply