ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर

अहमदाबाद – सुरक्षा, व्यापार आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील थेट संवाद वाढवून आपण भारत व ऑस्ट्रेलियाचे संबंध अधिकच भक्कम करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दिली. भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज गुजरातच्या अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. या भारतभेटीच्या आधी पंतप्रधान अल्बानीज व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी भारताबाबत केलेली विधाने चीनची अस्वस्थता वाढवित असल्याचे दिसते.

Australian PM on visitचीनसारख्या प्रबळ देशाने ऑस्ट्रेलियाबरोबर व्यापारयुद्ध पुकारलेले असताना, ऑस्ट्रेलियाने भारताबरोबरील व्यापारी सहकार्य वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यानुसार भारत व ऑस्ट्रेलियामध्ये मुक्त व्यापारी करार संपन्न झाला आहे. सध्याच्या काळात ऑस्ट्रेलिया हा भारताबरोबर सर्वाधिक प्रमाणात व्यापार करणाऱ्या देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. भारत करीत असलेल्या दमदार आर्थिक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला भारतात फार मोठी संधी असल्याचा दावा पंतप्रधान अल्बानीज यांनी केला. यासाठी व भारताबरोबरील सर्वच आघाड्यांवरील संबंध दृढ करण्यासाठी ऑस्ट्रेलिया पुढाकार घेईल. आपला हा दौरा यासाठी ऑस्ट्रेलियाची बांधिलकी स्पष्ट करणारा आहे, असा दावा पंतप्रधान अल्बानीज यांनी केला.

भारत व ऑस्ट्रेलियासमोर या क्षेत्रातील स्थैर्य व विकासासाठी आपले संबंध व्यापक करण्याची ऐतिहासिक संधी आहे, असे पंतप्रधान अल्बानीज पुढे म्हणाले. याआधी आपली भारताच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी चार वेळा द्विपक्षीय भेट झाली होती. मात्र पंतप्रधान म्हणून आपण पहिल्यांदाच भारताच्या भेटीवर येत आहोत, असे अल्बानीज यांनी म्हटले आहे.

हिंदी

leave a reply