ऑस्ट्रेलियाने कोरोनाव्हायरसच्या चौकशीची केलेली मागणी म्हणजे चीनचा विश्वासघात

- ऑस्ट्रेलियातील वरिष्ठ चिनी अधिकाऱ्याचा आरोप

कॅनबेरा – अमेरिका कोरोनाव्हायरस च्या मुद्दावरून सर्व दोष चीनवर टाकण्याचा प्रयत्न करीत असतानाच, ऑस्ट्रेलियाने कोरोनाव्हायरसच्या चौकशीसंदर्भात केलेली मागणी म्हणजे चीनचा विश्वासघात होता, असा खळबळजनक आरोप वरिष्ठ चिनी अधिकारी वँग शिनिंग यांनी केला. शिनिंग हे ऑस्ट्रेलियातील चिनी दूतावासाचे उपप्रमुख असून त्यांनी ऑस्ट्रेलियाला लक्ष्य करताना ‘ज्युलिअस सीझर’ या नाटकातील ‘ब्रुट्स यु टू’ या वाक्प्रचाराचा आधार घेतला. त्याचवेळी अमेरिका चीन व ऑस्ट्रेलियामधील संबंधांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.

चीनचा विश्वासघात

एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाने कोरोना साथीच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. साथीचे मूळ व इतर बाबींची ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’कडून चौकशी करण्याची मागणी ऑस्ट्रेलियाने केली होती. ‘डब्ल्यूएचओ’मध्ये यासाठी ठराव सादर करण्यासाठीही ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेतला. ऑस्ट्रेलियाच्या या हालचालींवर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. ऑस्ट्रेलियाने ‘डब्ल्यूएचओ’मध्ये ठराव मांडल्यास मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल, असे चीनकडून धमकावण्यात आले होते. मात्र चीनकडे दुर्लक्ष करून ऑस्ट्रेलिया आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे संतापलेल्या चीनने ऑस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर थेट ८० टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. नंतर चीनने आपल्या पर्यटकांना तसेच विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलिया टाळण्याचाही सल्ला दिला होता.

चीनकडून येणाऱ्या धमक्या व इशाऱ्यानंतरही ऑस्ट्रेलियाने आपली भूमिका कायम ठेवली आहे. कोरोनाव्हायरसच्या मुद्दा पाठोपाठ हॉंगकॉंग, तैवान तसेच साऊथ चायना सीच्या मुद्द्यावरही ऑस्ट्रेलियाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाने, साऊथ चायना सी क्षेत्रातील विविध भागांबाबत चीनकडून करण्यात येणारे सर्व दावे ऑस्ट्रेलिया धुडकावत आहे, अशी जाहीर भूमिका घेतली होती. त्याच वेळी हॉंगकॉंगमध्ये चीनने लादलेल्या नव्या कायद्यामुळे बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे ऑस्ट्रेलियात स्वागत असेल, अशीही घोषणा केली होती.

चीनचा विश्वासघात

चीन व ऑस्ट्रेलिया या प्रमुख व्यापारी भागीदार देशांमधील तणाव गेल्या काही वर्षांपासून हळूहळू समोर येत होता. ऑस्ट्रेलियाच्या अंतर्गत राजकारणातील हस्तक्षेप व सायबरहल्ले यासारख्या मुद्द्यांमुळे वाढत गेलेल्या तणावात यावर्षी कोरोना साथीची भर पडली आहे. दोन देशांमधील संबंध आता विकोपाला गेल्याचे दिसत आहे. साऊथ चायना सीच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे यापुढे दोन देशांमधील संबंध पूर्वपदावर येण्याची शक्यता मावळल्याचे दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर, ऑस्ट्रेलियातील चिनी दूतावासाच्या उपप्रमुखांनी केलेले दावे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत.

कोरोनाव्हायरसच्या चौकशीवरून ऑस्ट्रेलियावर विश्वासघाताचा आरोप करणारी चिनी अधिकारी शिनिंग यांनी, त्याचे मूळ अथवा चौकशीतून बाहेर येणाऱ्या निष्कर्षाबाबत बोलण्याचे मात्र टाळले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियातील चिनी अधिकारी व वास्तव्य करणारे नागरिक दोन देशांमधील चांगल्या संबंधांसाठी प्रयत्न करीत असताना, इतर घटक मात्र ते बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

leave a reply