संरक्षणदलप्रमुखांच्या इशाऱ्यानंतर चीनची भाषा बदलली

नवी दिल्ली – चीनबरोबर सुरू असलेल्या सीमावादावरील चर्चा अपयशी ठरली तर लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचा इशारा भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिला होता. त्यानंतर चीनने नरमाईची भूमिका स्वीकारली आहे. भारतातील चीनचे राजदूत सन वेईडाँग यांनी गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या भारत व चीनच्या सैनिकांमधील संघर्ष दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच चीन भारताकडे आपला वैरी म्हणून नाही, तर भागीदार म्हणून पाहत असल्याचे चीनचे राजदूत वेईडाँग यांनी म्हटले आहे.

संरक्षणदलप्रमुख

गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी स्तरावर अनेक बैठका पार पडल्या आहेत. पण या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नसून अजूनही पँगाँग-त्सो, देप्साँग तसेच फिंगर क्लिफच्या सीमेजवळ चीनच्या लष्कराची तैनाती जैसे थे असून काही ठिकाणी चीनने ही तैनाती वाढविल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. भारताबरोबर वाटाघाटींद्वारे चीन वेळकाढू भूमिका स्वीकारीत असल्याचा आरोपही काही लष्करी विश्लेषक करू लागले आहेत. सीमेवरील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीच्या काही तासानंतर संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चीनच्या विरोधात लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचा खुला इशारा दिला होता.

भारतीय संरक्षणदलप्रमुखांनी दिलेल्या या इशार्‍यावर चीनकडून मोठी प्रतिक्रीया अपेक्षित होती. पण भारतातील चीनचे राजदूत सन वेईडाँग यांनी दिलजमाईच्या भाषेचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. ‘गलवान भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेली झडप ही दुर्दैवी घटना ठरते. इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ही घटना महत्त्वपूर्ण ठरत नाही. सीमेवर अशा दुर्दैवी घटना घडाव्यात, असे दोन्ही देशांना वाटत नाही. आता या घटना व्यवस्थितरीत्या सांभाळण्याचा उभय देश प्रयत्‍न करीत आहे’, असा दावा चीनच्या राजदूतांनी केला. एका वेबिनारला संबोधित करताना त्यांनी भारताकडे शांततेचे आवाहन केले. यासाठी चीनच्या राजदूतांनी भारताबरोबरच्या सात दशकांपासूनच्या सहकार्याची आठवण करुन दिली. भारत आणि चीनमध्ये ७० वर्षांपासून राजनैतिक संबंध आहेत. अनेकवेळा या द्विपक्षीय संबधांमध्ये कटुता आली आहे. पण त्या दरम्यानही उभय देशांमधला तणाव वाढला नाही. त्यामुळे गलवानच्या घटनेवरून उभय देशांमधले संबंध बिघडू नयेत. भारत आणि चीनमधले संबंध बिघडण्यापेक्षा सुरळीत व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करुन वेईडाँग यांनी आपल्या देशाने नरमाईची भाषा स्वीकारल्याचे दाखवून दिले.

संरक्षणदलप्रमुख

तर, चीन भारताकडे शत्रूच्या बदल्यात भागीदार आणि धोक्याच्या बदल्यात संधी म्हणून पाहत असल्याचे चीनचे राजदूत यावेळी म्हणाले. कुठलाही देशाला जगापासून अलिप्त ठेवता येणार नाही. आत्मनिर्भरतेबरोबरच बाहेरील देशांना व्यासपीठ खुले करुन द्यायला हवे, असे राजदूत वेईडाँग यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, भारताचा उल्लेख चीनचा व्यापारी भागीदार देश असा करुन उभय देशांनी एकमेकांकडे चुंबकासारखे आकर्षित व्हायला हवे, अशी अपेक्षा चीनच्या राजदूतानी व्यक्त केली. गलवानमधील संघर्षानंतर भारताने स्वीकारलेल्या कठोर आर्थिक, व्यापारी धोरणांमुळे चीनला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले आहे. तर या एका घटनेमुळे भारताने चीनच्या विस्तारवादाचा मुखवटा टराटरा फाडल्यानंतर पाश्चिमात्य कंपन्यांनी देखील चीनमधून माघार घेत भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. याचे जबर हादरे चीनच्या अर्थव्यवस्थेला बसू लागले असून कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या नेतृत्त्वावर उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

भारताकडून हे व्यापारी हादरे बसत असताना, सीमारेषेवरही भारताने आपली सैन्यतैनाती सुरू ठेवली आहे. भारताने अतिप्रगत लढाऊ विमानांबरोबरच हवाई सुरक्षा यंत्रणा, रणगाडे, तोफा सीमेजवळच्या भागात तैनात केल्या आहेत. त्याचबरोबर रशियाकडून खरेदी केलेले विमानभेदी ‘मॅनपॅड्स’ देखील या भागात दाखल झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिलेला सज्जड इशारा चीनला पुढील परिणामांची जाणीव करुन देणारा ठरतो. या पार्श्वभूमीवर, चीनच्या राजदूतांनी नरमाईचे सूर लावल्याचे दिसत आहे. पण चीनच्या या भूमिकेकडेही भारतीय विश्लेषक अधिक सावधतेने पाहत आहे.

leave a reply