चीनला हंबंटोटा बंदर देऊन श्रीलंकेने चूक केली

- श्रीलंकेच्या परराष्ट्र सचिवांची कबुली

कोलंबो, दि. २६ – श्रीलंकेने चीनला ‘हंबंटोटा’ बंदर देऊन फार मोठी चूक केल्याचे श्रीलंकेचे परराष्ट्रसचिव जयनाथ कोंलबेज यांनी मान्य केले. पण यापुढे श्रीलंकेचे परराष्ट्र धोरण भारतकेंद्री असेल, अशी ग्वाही परराष्ट्रसचिव कोंलबेज यांनी दिली. तसेच भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचेल, अशी कोणतीही कृती श्रीलंकेकडून होणार नसल्याचे आश्वासन कोलबेंज यांनी दिले. श्रीलंकन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताला आश्वस्त केले. श्रीलंकेत सत्तेवर आलेले महिंदा राजपक्षे यांच्या सरकारने गेल्या महिन्याभरात चीनवर केलेली ही दुसरी मोठी टीका आहे.

हंबटोटा

‘श्रीलंकेच्या परराष्ट्र धोरणात भारताला प्राधान्य असेल. यापुढे श्रीलंका भारतासाठी धोकादायक नसेल. श्रीलंकेच्या संपत्तीचा दुसर्‍या कोणत्याही देशाला वापर करुन दिला जाणार नाही’, असे आश्वासन श्रीलंकेच्या परराष्ट्र सचिवांनी दिले. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसारच भारताबरोबरील संबधांना प्राधान्य देण्यात येत आहे. आर्थिक विकासासाठी एका देशावर अवलंबून राहता येत नाही. भारताची आम्हाला गरज आहे, असे कोंलबेज पुढे म्हणाले.

कोंलबेज २०१२ ते २०१४ सालापर्यंत श्रीलंकेचे नौदलप्रमुख होते. तसेच ते श्रीलंकेच्या परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक मानले जातात. त्यांनी हंबंटोटा बंदर चीनला देऊन श्रीलंकेने फार मोठी चूक केल्याचे मान्य केले. २०१७ साली श्रीलंकेने चीनला ‘हंबटोटा’ बंदर ९९ वर्षांसाठी भाड्याने दिले होते. भारताने यावर चिंता व्यक्त केली होती. या बंदराचा वापर करुन चीन आपले लष्करी तळ उभारणार होता. पण चिनी कर्जाचा विळखा वाढल्यानंतर श्रीलंकेने चीन संदर्भातल्या धोरणात बदल केले आहेत. सध्या चिनी कंपनीचे या बंदरात ८५ टक्के शेअर आहे. तसेच चीनला हे बंदर व्यावसायिक कामासाठीच वापरण्याचे श्रीलंकेने आदेश दिले आहेत. याचा वापर लष्करी कारवाईसाठी होता कामा नये, असे श्रीलंकेने चीनला खडसावून सांगितले. थोडक्यात या बंदराचा वापर भारतविरोधी होणार नसल्याचे श्रीलंका भारताला सांगत आहे.

हंबटोटा

याआधी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असताना महिंदा राजपक्षे यांचे धोरण चीनधार्जिणे होते. भारतद्वेष्टे नेते अशी त्यांची ओळख होती. पण श्रीलंकेभोवती कर्जाचा विळखा वाढू लागल्यावर आणि अर्थव्यवस्था ढासळल्यांनतर राजपक्षे यांचे धोरण बदलल्याचे बोलले जाते. शिवाय श्रीलंकेवरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात राजपक्षे यांना भारताची गरज वाटू लागली आहे. म्हणून श्रीलंकेत पुन्हा सरकार स्थापन केल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी भारताला महत्त्व दिले.

श्रीलंकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर राजपक्षे यांनी भारताच्या पंतप्रधानांना पहिला फोन लावून उभय देशांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. इतकेच नाही तर गोताबाया राजपक्षे यांनी शपथविधीनंतर पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड करुन श्रीलंकेच्या परराष्ट्र धोरणात भारताला प्रथम प्राधान्य असेल, याचे संकेत दिले होते. चीन भारताच्या शेजारी देशांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्‍न करीत असताना, श्रीलंका आणि भारताचे हे वाढते सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

leave a reply