युक्रेनवरून चिथावणी देणारी वक्तव्ये करु नका

- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची ज्यो बायडेन यांना समज

पॅरिस/वॉशिंग्टन/मॉस्को – पाश्‍चिमात्य देशांनी युक्रेनच्या मुद्यावर चिथावणी देणारी वक्तव्ये करु नयेत, अशा आक्रमक शब्दात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी खडसावले आहे. मॅक्रॉन यांचे हे उद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबाबत केेलेल्या वक्तव्यांवरील प्रतिक्रिया आहे. यावेळी मॅक्रॉन यांनी आपण असे वक्तव्य कधीच केले नसते, असा टोलाही बायडेन यांना लगावला. बायडेन यांच्या उद्गारांवर अमेरिकी संसद सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली असून राष्ट्राध्यक्षांनी ‘स्क्रिप्ट’शी प्रामाणिक रहावे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चिथावणी देणारी वक्तव्येशनिवारी पोलंडमधील एका कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘युक्रेनवर हल्ला चढविणारे पुतिन कसाई आहेत. रशिया युक्रेनमध्ये कधीच विजयी होऊ शकणार नाही. पुतिन यापुढे सत्तेवर राहू शकणार नाहीत’, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले. यावेळी बायडेन यांनी युक्रेनमधील युद्ध हे रशियाचे धोरणात्मक अपयश असल्याचाही दावा केला होता.

यातील पुतिन यांचा कसाई म्हणून केलेला उल्लेख व रशियातील सत्ताबदलासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरून रशियासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेले वक्तव्य अतिशय चिंताजनक असून यापुढे त्यांच्या वक्तव्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी बजावले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनीही बायडेन यांच्या उद्गारांवर नाराजी व्यक्त केली.

चिथावणी देणारी वक्तव्ये‘पाश्‍चिमात्य देशांनी युक्रेन संघर्षाबाबत वक्तव्ये करताना योग्य नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. आपण पुतिन यांच्याप्रती अशारितीने वक्तव्य केले नसते. युक्रेनसंदर्भात आपण सातत्याने त्यांच्याशी चर्चा करीत आहोत. रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेला संघर्ष कोणत्याही चिथावणीविना थांबवायचा आहे, याची जाणीव सर्वांना असायला हवी’, अशा शब्दात मॅक्रॉन यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

बायडेन यांच्या वक्तव्यावर अमेरिकेकडूनही सातत्याने खुलासे देणे सुरू आहे. रविवारी परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन तसेच व्हाईट हाऊसकडून करण्यात आलेल्या खुलाशानंतर सोमवारी पुन्हा एकदा स्वतंत्र निवेदन जारी करण्यात आले. त्यात रशियात सत्ताबदल घडविण्याचा अमेरिकेचा कोणताही इरादा नसून बायडेन यांचे वक्तव्ये भावनिक होती, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र अमेरिकेतील संसद सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना धारेवर धरले असून बायडेन यांनी चौकटीबाहेर जाऊन वक्तव्ये करणे टाळावे, असा टोला रिपब्लिकन पक्षाच्या संसद सदस्यांनी लगावला आहे.

leave a reply