इस्रायल, युएई, बाहरिन, मोरोक्को व इजिप्तची इराणविरोधी आघाडी

से बोकर – इस्रायल आणि सहकारी अरब देशांना पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आणणारी ‘नेगेव्ह परिषद’ ऐतिहासिक ठरली. या बैठकीत सहभागी झालेल्या इस्रायल व अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला रोखण्यासाठी नव्या सुरक्षा आघाडीची घोषणा केली. तसेच अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव कमी होत असताना, आर्थिक आघाडीवरही एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे या परिषदेत अधोरेखित करण्यात आले. अशा या इस्रायल व अरब देशांमधील अशक्य वाटणारी ही परिषद यापुढे दरवर्षी नियमितपणे आयोजित करण्याचे सर्व नेत्यांनी मान्य केले. इस्रायल व अरब देशांमधील या बैठकीमुळे बेचैन झालेल्या बायडेन प्रशासनाने याच्या एक दिवस आधीच आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना इस्रायलमध्ये रवाना केले होते.

इराणविरोधी आघाडीइराणबरोबरील अणुकरार अगदी समीप पोहोचल्याच्या बातम्या समोर येत असताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन इस्रायलमध्ये दाखल झाले. बायडेन प्रशासनावरील विश्‍वास गमावलेल्या इस्रायल व अरब देशांना आश्‍वस्त करण्यासाठी ब्लिंकन यांनी धडपड केल्याचा दावा केला जातो. यासाठी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचे आश्‍वासनही परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी इस्रायल व नंतर नेगेव्ह परिषदेत अरब देशांना दिले. पण बायडेन प्रशासनाच्या आश्‍वासनांवर आपला विश्‍वास नसल्याचे इस्रायल व अरब देशांनी नेगेव्ह परिषदेत दाखवून दिले.

इस्रायलने आयोजित केलेल्या या बैठकीत युएई, इजिप्त, बाहरिन व मोरोक्को या अरब देशांचे परराष्ट्रमंत्री हजर होते. रविवार व सोमवार, असे दोन दिवस चाललेल्या या परिषदेत इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून उपस्थित सर्वच देशांच्या सुरक्षेला समान धोका असल्याचे अधोरेखित केले. यानंतर इराणविरोधात सुरक्षाविषयक आघाडीत सहभागी होण्यावर इस्रायल आणि अरब देशांमध्ये ऐतिहासिक सहमती झालेली आहे.

तर युएईचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन झाएद अल नह्यान यांनी नेगेव्ह परिषद ही इस्रायल व अरब देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी ऐतिहासिक बाब ठरत असल्याचे स्पष्ट केले. ‘गेली कित्येक वर्षे इस्रायल या क्षेत्राचा एक हिस्सा असला तरी पहिल्यांदाच अरब देश आणि इस्रायलमध्ये अशी चर्चा होत आहे. ४३ वर्षांपूर्वी इजिप्तने इस्रायलबरोबरच्या सहकार्याची सुरुवात केली. आम्ही ही सहकार्याची ४३ वर्षे गमावली आहेत. पण आत्ता आम्ही इतर अरब देश इजिप्तच्या पावलांवर पाऊल ठेवत आहोत’, अशी घोषणा युएईचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला यांनी केली.

तसेच नेगेव्ह परिषद ही ‘हादेरा’ येथील दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर असल्याचे युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. नेगेव्ह परिषदेच्या काही तास आधी इस्रायलच्या हादेरा येथे इस्रायली सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. यामध्ये दोन पोलीस जवानांचा बळी गेला तर पाच जण जखमी झाले. आयएस या दहशतवादी संघटनेने हादेरा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

नेगेव्ह परिषदेला उपस्थित अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी कधी शक्य नसलेल्या गोष्टी आता शक्य होत असल्याचे सांगून इस्रायल व अरब देशांमधील सहकार्यावर प्रतिक्रिया दिली. यावर इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी यापुढेही दरवर्षी नियमितपणे इस्रायल व अरब देशांमधील ही अशक्य वाटणारी बैठक आयोजित करण्यात येईल, असे जाहीर केले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे राष्ट्राध्यक्ष सिसी, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांच्यात लक्षवेधी बैठक पार पडली होती. या बैठकीत इराणविरोधात सुरक्षा धोरणावर चर्चा पार पडल्याचे वृत्त इस्रायली माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अवघ्या सहा दिवसात नेगेव्ह परिषदेत इस्रायलसह, युएई, इजिप्त, बाहरिन व मोरोक्को या देशांचे इराणविरोधी आघाडीवर झालेले एकमत महत्त्वाचे ठरते. अमेरिका इराणबरोबर अणुकराराच्या तयारीत असताना या परिषदेला मिळालेले यश अमेरिकेला अस्वस्थ करणारे ठरते.

leave a reply